तासगाव (सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे ९८९०३८२०४१
तासगाव तालुक्यातील तुरची फाटा येथील गायरान पारधी वस्तीत चोरीच्या तपासासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाकडून दगडफेक करण्यात आल्याची गंभीर घटना मंगळवारी सकाळी घडली. या घटनेत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून पोलीस वाहनाचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी सहा जणांविरोधात तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागाव कवठे येथील नागनाथ मंदिरातील दागिने चोरीप्रकरणाचा तपास तासगाव पोलीस करत होते. सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे काही संशयितांचा माग काढत पोलीस मंगळवारी सकाळी तुरची फाटा परिसरातील पारधी वस्तीत चौकशीसाठी गेले होते.
यावेळी पोलीस कर्मचारी सुरेश भोसले, अमर सूर्यवंशी व संतोष माळी यांनी काही संशयितांकडे चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान घरातून काही संशयास्पद साहित्य मिळाल्याने पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी काही महिलांसह स्थानिकांनी पोलिसांच्या कारवाईला विरोध करत मोठा गोंधळ घातला.
परिस्थिती अचानक चिघळत जमावाकडून पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात वाहनाची समोरील काच फुटली. तसेच पोलिसांनाही मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला चावा घेतल्याचाही उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले. काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी जयश्री चव्हाण, बबलू शिंदे, पूजा शिंदे, प्रशांत शिंदे, अरविंद चव्हाण आणि मच्छिंद्र चव्हाण यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तासगाव पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे तासगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment
0 Comments