भिलवडी( सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041
खटाव ता.पलूस येथे द्राक्ष बागायतदार शेतकरी विश्वजीत आनंदराव पाटील यांच्या द्राक्ष बागेत अज्ञात व्यक्तीने ट्रॅक्टर फिरवून मोठे नुकसान केल्याची धक्कादायक घटना ११ फेब्रुवारीच्या रात्री घडली. या घटनेत सुमारे दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
विश्वजीत पाटील यांच्या घराशेजारी सुमारे दोन एकर क्षेत्रावर द्राक्ष बाग असून सध्या बागेत चांगल्या प्रतीचे पीक आले होते. अवघ्या महिन्याभरात हे द्राक्ष बाजारात जाण्याच्या तयारीत असतानाच अज्ञात व्यक्तीने पाटील यांच्या घराजवळ उभा असलेला ट्रॅक्टर घेऊन थेट द्राक्ष बागेत घुसवला व संपूर्ण बागेत फिरवून मोठे नुकसान केले.
या घटनेत अंदाजे साडेतीनशे ते चारशे द्राक्ष झाडांचे नुकसान झाले असून बागेतील लोखंडी अँगल, तारा तसेच ट्रॅक्टरचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ऐन हंगामात झालेल्या या प्रकारामुळे पाटील कुटुंबीयांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिपक पाटील व पोलीस शिपाई स्वप्निल शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून संशयित आरोपीला लवकरच ताब्यात घेण्यात यश येईल, असा विश्वास स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, संबंधित ट्रॅक्टर पूर्व वैमनस्य, राजकीय सूडबुद्धी, चोरीचा प्रयत्न किंवा जाणीवपूर्वक शेतीचे नुकसान करण्याच्या उद्देशाने नेण्यात आला का, याचा शोध भिलवडी पोलीस घेत आहेत.
या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली असून दोषींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी व शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.




Post a Comment
0 Comments