दुधोंडी(सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे
दुधोंडी जिल्हा परिषद गटात भारतीय बौद्ध महासंघ, समता दल तसेच वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार सौ. उज्वला विश्वनाथ कांबळे यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, त्यांच्या विजयाच्या शक्यता अधिक बळकट होत असल्याचे चित्र दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या प्रचार फेरीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत त्यांना पाठिंबा दर्शविला.
प्रचारादरम्यान सौ. कांबळे यांनी गटातील विविध भागांना भेटी देत नागरिकांच्या अडीअडचणी, समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सेवा, शिक्षण व इतर मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देत, निवडून आल्यानंतर त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.
या प्रचार फेरीत प्रा. डॉ. विश्वजीत कांबळे, सचिन पवार, संजय घाडगे, मनोहर पाटील, जीवन क्षीरसागर, रमेश पाटील, नंदा क्षीरसागर, वनिता कांबळे, कुमार धाईंजे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. समर्थकांनी घोषणा देत व थेट जनसंपर्क साधत प्रचार अधिक प्रभावी केला.
यावेळी बोलताना सौ. कांबळे यांनी दुधोंडी गटामध्ये मूलभूत सोयी-सुविधांचा बोजवारा उडाल्याचा आरोप केला. सत्ताधारी व विरोधक दोघांनीही या भागाच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्यामुळे गट विकासापासून वंचित राहिल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांनीही वर्षानुवर्षे कोणताही ठोस विकास न झाल्याची खंत व्यक्त केली. पूरग्रस्तांना अद्याप पुरेशी मदत मिळाली नसल्याचे सांगत स्थानिक नेतृत्वावर दुर्लक्षाचा आरोप करण्यात आला. तसेच अनेक ठिकाणी आठ-आठ दिवस पिण्याचे पाणी मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी मांडली. काही लाभार्थ्यांना मोफत रेशन मिळत नसल्याचे व महिलांसाठी असलेल्या योजना केवळ कागदावरच असल्याचेही नागरिकांनी नमूद केले.
या सर्व समस्यांवर उपाय करण्यासाठी जनतेने एकदा संधी द्यावी, दिलेल्या संधीचे सोने करू, असा विश्वास व्यक्त करत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून गटाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सौ. कांबळे यांनी स्पष्ट केले.
दुधोंडी जिल्हा परिषद गटात वाढत असलेला प्रतिसाद पाहता, निवडणुकीत चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Post a Comment
0 Comments