भिलवडी ( सत्यवेध न्यूज )
पंकज गाडे 9890382041
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम सर्वत्र वाजू लागले असून, उमेदवार घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत प्रचारात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भिलवडी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांच्या प्रचाराला चांगलाच वेग दिला आहे.
स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम व विद्यमान आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या विकासकामांची परंपरा, तसेच लोकनेते स्व. बाळासाहेब काका पाटील आणि स्वर्गीय संग्राम दादा पाटील यांची सामाजिक-राजकीय कारकीर्द आजही जनतेच्या स्मरणात आहे. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत स्वर्गीय संग्राम दादा पाटील यांना अवघ्या ७७ मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्या जिव्हारी लागलेल्या पराभवाची सल भरून काढण्यासाठी यावेळी त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे.
त्या दृष्टीने भिलवडी गटात भेटीगाठी, प्रचार फेऱ्या व जनसंपर्क कार्यक्रम जोमात सुरू असून, मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. प्रतीक पाटील हे सर्वाधिक मतांनी विजयी होतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
नुकतेच भिलवडी जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार प्रतीक पाटील व वसगडे पंचायत समिती गणाच्या उमेदवार शोभा आनंदा हजारे यांनी खटाव व ब्रह्मनाळ गावांत प्रचाराची सुरुवात केली. यावेळी ग्रामस्थांनी “आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही नक्कीच विजयी व्हाल,” असा विश्वास व्यक्त करत उमेदवारांना पाठिंबा दिला.
या प्रचारप्रसंगी भिलवडी गावचे माजी सरपंच शहाजी गुरव, राहुल वसंत कांबळे, माजी उपसरपंच चंद्रकांत पाटील, बाळासाहेब मोरे, पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रल्हाद गडदे, उत्तर भाग सोसायटीचे चेअरमन रमेश पाटील यांच्यासह सचिन पाटील, अमोल पाटील, अनिल पाटील, दादासो व शब्बीर मद्वाण्णा, सागर गडदे, शरद पाटील, मोहन शिनगारे, सहदेव कारंडे, दत्तात्रय गडदे, उत्तम बंडगर, चंद्रशेखर मद्वाण्णा, प्रशांत राजोबा, सुधीर साळुंखे, आण्णासो गावडे, सिद्धकुमार वडेर, बिरबल बंडगर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकूणच भिलवडी जिल्हा परिषद गटात काँग्रेसचा प्रचार चांगलाच तापू लागला असून, येणाऱ्या निवडणुकीत प्रतीक पाटील यांना मोठे मताधिक्य मिळणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.


Post a Comment
0 Comments