भिलवडी (सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041
माझ्या रक्तातच संघर्ष आहे. सामान्य जनतेच्या हक्कांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहीन, असे ठाम मत सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते मोहन तावदर यांनी व्यक्त केले. भिलवडी येथे आयोजित निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सनी यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
या मेळाव्यास शेकडो कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात उपस्थिती लावली. आगामी निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याचा निर्धार मोहन तावदर यांनी यावेळी जाहीर केला. लोकांचा विश्वास आणि कार्यकर्त्यांची ताकद हेच माझे खरे भांडवल आहे. कोणत्याही पक्षाच्या दबावाखाली न झुकता प्रामाणिक व जनहिताचे राजकारण करणार, असे त्यांनी स्पष्ट केले.
राजकारणासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावल्याचे सांगताना तावदर यांनी भावनिक वक्तव्य केले. राजकारणासाठी मी माझे स्वतःचे घर जाळले, कुटुंब विखुरले गेले. स्वर्गीय डॉ. पतंगरावजी कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासकामे केली. मात्र साहेबांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षातील काही नेत्यांनी माझ्यावर अन्याय केला, असा आरोप त्यांनी केला. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच विधानसभा निवडणुकांतील काँग्रेसच्या जय-पराजयात आपली भूमिका महत्त्वाची राहिल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.
मेळाव्यात उपस्थित अनेक कार्यकर्त्यांनी मोहन तावदर यांना जाहीर पाठिंबा देत भक्कम साथ देण्याचे आश्वासन दिले. परिसरातील विकासकामे, युवकांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणी, रस्ते व रोजगार यासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
महापूराच्या संकट काळात मोहन तावदर यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची यावेळी आवर्जून आठवण करून देण्यात आली. अतिवृष्टीमुळे अनेक गावांना पाण्याचा वेढा बसला असताना त्यांनी स्वतः मैदानात उतरून मदतकार्य केले होते. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवणे, पूरग्रस्तांना अन्नधान्य, पिण्याचे पाणी, औषधे व जीवनावश्यक साहित्य वाटप करणे, प्रशासनाशी समन्वय साधून तातडीची मदत पोहोचवणे तसेच रात्रंदिवस पूरग्रस्त भागात फिरून नागरिकांना धीर देण्याचे कार्य त्यांनी केले. अनेक कुटुंबांना तात्पुरता निवारा मिळवून देण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. या सेवाभावी कार्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी मोठा विश्वास निर्माण झाल्याचे उपस्थितांनी सांगितले.
यावेळी पुढे बोलताना तावदर यांनी काँग्रेस पक्षाविषयीची खदखद उघडपणे व्यक्त केली. पक्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय न मिळणे, स्थानिक पातळीवर दुर्लक्ष होणे आणि चुकीच्या निर्णयांमुळे जनतेचा विश्वास कमी होत असल्याची त्यांनी तीव्र टीका केली.
सामाजिक कार्यकर्ते सनी यादव यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत संघटन अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणे हीच खरी सेवा आहे, असे ते म्हणाले.
या मेळाव्यामुळे परिसरातील राजकीय वातावरण तापले असून आगामी निवडणुकीत मोहन तावदर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




Post a Comment
0 Comments