भिलवडी(सत्यवेध न्युज)
पंकज गाडे 9890382041
स्वर्गीय आनंदराव भाऊ मोहिते यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा वारसा जपण्यासाठी बाळासाहेब (काका) मोहिते यांनी पुढे यावे, अशी आग्रही भूमिका भिलवडी जिल्हा परिषद गटातील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मांडली जात आहे. त्यांना जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवावी, अशी मागणी जोर धरू लागली असून, याबाबत आमदार डॉ. विश्वजीत कदम व तालुक्याचे नेते महेंद्र लाड यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्वर्गीय आनंदराव भाऊ मोहिते यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात पन्नास वर्षांहून अधिक काळ काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून अतुलनीय सेवा केली. त्यांचे कार्य केवळ स्थानिक नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित होते. काँग्रेसच्या विचारधारेस आयुष्य समर्पित करत त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने योगदान दिले. स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम यांच्याशी त्यांचा अतूट स्नेह होता. साहेबांच्या सोबत सावलीप्रमाणे राहून त्यांनी महाराष्ट्रभर काँग्रेसची तत्वे रुजवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.
पक्षाच्या कठीण काळातही आनंदराव भाऊ मोहिते खंबीरपणे उभे राहिले. राजकारणात त्यांनी ठाम तत्वे जपली. आपल्या हयातीत घराण्यातील कोणालाही राजकारणात येऊ दिले नाही; मात्र समाजातील सर्व घटकांसाठी समतोल व समांतर कार्य करत लोकसेवेचा आदर्श निर्माण केला.
भाऊंच्या निधनानंतर त्यांचा सामाजिक व राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी दक्षिण भाग सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब (काका) मोहिते यांनी पुढे यावे, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग, लोकांच्या सुख-दुःखात कायमची उपस्थिती आणि कार्यकर्त्यांशी असलेला जवळचा संपर्क यामुळे त्यांच्याकडे सक्षम नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे.
त्यामुळे बाळासाहेब (काका) मोहिते यांना भिलवडी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देण्यात यावी, अशी आग्रही मागणी कार्यकर्ते करत आहेत. पक्षश्रेष्ठींनी त्यांची उमेदवारी जाहीर करून मोहिते घराण्याला पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय भूमिका देण्याची संधी द्यावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. आगामी काळात पक्षनेतृत्व कोणता निर्णय घेते, याकडे संपूर्ण तालुका व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment
0 Comments