भिलवडी (ता. पलूस) परिसरात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून विविध पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. भिलवडी जिल्हा परिषद गटातून भिलवडी गावचे माजी सरपंच विजयकुमार चोपडे यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी, यासाठी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी जोरदार आग्रही भूमिका घेतली आहे.
यासंदर्भात भिलवडी गावचे माजी सरपंच धनंजय सुभाष (दादा) पाटील, भिलवडी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब चोपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विजयकुमार चोपडे यांच्या उमेदवारीची मागणी एकमुखाने लावून धरण्यात आली. याबाबत लवकरच आमदार डॉ. विश्वजीत कदम यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करून उमेदवारी निश्चित करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
विजयकुमार चोपडे यांनी भिलवडी गावचे सरपंच म्हणून सलग दहा वर्षे अत्यंत पारदर्शक, शिस्तबद्ध व लोकाभिमुख कारभार केला आहे. ग्रामविकास, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, शिक्षण सुविधा तसेच विविध सामाजिक उपक्रमांमुळे त्यांच्या कार्यकाळात गावाच्या विकासाला गती मिळाली. अनेक विकासकामे मार्गी लागल्याने नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वासार्ह व सकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे.
ग्रामपातळीबरोबरच सहकार क्षेत्रातही विजयकुमार चोपडे यांचा मोठा अनुभव आहे. ते तासगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक, वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व उपाध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले आहेत. तसेच भिलवडी शिक्षण संस्थेत संचालक म्हणून पाच वर्षे त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले असून दक्षिण भाग सोसायटीचे चेअरमन म्हणूनही पाच वर्षे सक्षम व पारदर्शक कारभार केला आहे.
या सर्व अनुभवाच्या जोरावर जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याची क्षमता विजयकुमार चोपडे यांच्यात असल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, शेतीसाठी पाणी व्यवस्थापन, युवकांसाठी रोजगार संधी, महिलांसाठी स्वयंरोजगार योजना तसेच शिक्षण व आरोग्य सुविधा मजबूत करण्यासाठी ते प्रभावी काम करू शकतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, प्रतिक्रिया देताना विजयकुमार चोपडे यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांनी दाखवलेला विश्वास माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि परिसराच्या विकासासाठी मी सदैव तत्पर आहे. पक्षश्रेष्ठी व आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल.
विजयकुमार चोपडे यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे भिलवडी जिल्हा परिषद गटातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, राजकीय वर्तुळात याबाबत उत्सुकता वाढली आहे. लवकरच यावर अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.



Post a Comment
0 Comments