भिलवडी(सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041
भिलवडी जिल्हा परिषद गट आणि पलूस पंचायत समिती गण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिलवडी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक व ग्रामस्थांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत गट-तट बाजूला ठेवून एकदिलाने काम करत आमदार डॉ. विश्वजीत कदम देतील तोच काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्याचा ठाम निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
भिलवडी हे जिल्हा परिषद गटातील मोठे व महत्त्वाचे गाव असून, या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. सध्या राज्यात काँग्रेसची सत्ता नसतानाही भिलवडी परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाल्याचा उल्लेख बैठकीत करण्यात आला. भविष्यातही या भागाच्या विकासाची घडी अधिक वेगाने पुढे जाणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांनी भिलवडी गावाच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.
गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत स्व. संग्राम पाटील यांचा निसटता पराभव झाला होता. या पराभवाची सल आजही कार्यकर्त्यांच्या मनात असून, यावेळी त्यांच्या चिरंजीव प्रतीक पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून प्रचंड मताधिक्याने विजय मिळवून देण्याचा निर्धार अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निवडणुकीसाठी वेळ कमी असल्याने अंतर्गत मतभेद, गटबाजी व वादविवाद टाळून सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी दिलेला उमेदवारच सर्व शक्तीनिशी निवडून आणण्याचा एकमुखी निर्णय यावेळी घेण्यात आला.
या बैठकीस काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी निवडणुकीत भिलवडी परिसरात काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत करून विजय निश्चित करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. मात्र जिल्हा परिषद उमेदवारीसाठी अनेक ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते इच्छुक असल्याने, आमदार डॉ. विश्वजीत कदम कोणती भूमिका घेणार व कोणाला उमेदवारी देणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.


Post a Comment
0 Comments