भिलवडी(सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041
भिलवडी (ता. पलूस) — भिलवडी जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रतीक पाटील यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी विवेक काळे यांच्याकडे दाखल केला. निवडणूक आचारसंहितेचे पालन करत मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.
प्रतीक पाटील हे दिवंगत काँग्रेस नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य स्व. संग्राम पाटील यांचे सुपुत्र असून, त्यांच्या उमेदवारीमुळे भिलवडी गटात तरुण नेतृत्वाला संधी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. वडिलांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवलेल्या विविध विकासकामांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार प्रतीक पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना व्यक्त केला.
बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने भिलवडी गटात अनेक प्रमुख इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी करतील, असे चित्र आहे. दरम्यान, प्रतीक पाटील यांना भिलवडी गटात मोठी सहानुभूती तसेच कार्यकर्त्यांचे भक्कम पाठबळ मिळत असल्याचे दिसून येत आहे.
भिलवडी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असून, या गटातून अनेक इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र काँग्रेसचा अधिकृत उमेदवार कोण असेल, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. आमदार डॉ. विश्वजीत कदम तसेच तालुक्याचे नेते महेंद्र लाड कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांसह राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment
0 Comments