Type Here to Get Search Results !

पलूसमध्ये उमेदवारीचा महासंग्राम!शेवटच्या दिवशी अर्जांचा अक्षरशः पाऊस; १६० जण रिंगणात, उद्या छाननी



पलूस ( सत्यवेध न्यूज ) 

पंकज गाडे 9890382041


आगामी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पलूस तालुक्यातील राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, २१ जानेवारी रोजी पलूस तहसील कार्यालय आणि पंचायत समिती स्तरावर इच्छुकांनी एकच गर्दी केली होती. दिवसभराच्या या 'अर्ज'वारीनंतर तालुक्यात पंचायत समितीसाठी ९७, तर जिल्हा परिषदेच्या ४ जागांसाठी ६३ उमेदवारांनी आपले नशीब आजमावण्यासाठी दंड थोपटले आहेत. आता उद्या होणाऱ्या अर्जांच्या छाननीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्यानंतरच खऱ्या संघर्षाची आकडेवारी समोर येईल.

​पंचायत समितीच्या ८ गणांसाठी झालेल्या अर्ज सादरीकरणात महिला शक्तीचे विशेष दर्शन घडले आहे. एकूण ९७ अर्जांपैकी ४२ अर्ज महिलांचे असून त्यांनी पुरुष उमेदवारांना  कडवे आव्हान दिले आहे. यामध्ये आमणापूर गणाने १९ अर्जांसह उच्चांक गाठला असून, विशेष म्हणजे येथे सर्व उमेदवार पुरुष आहेत. बांबवडे १५ अर्ज आणि कुंडल १३ अर्ज असून येथेही मोठी चुरस पाहायला मिळत आहे. मात्र, भिलवडी गणाचे चित्र काहीसे वेगळे असून येथील सर्व ५ अर्ज केवळ महिला उमेदवारांनी दाखल केले आहेत.

​जिल्हा परिषदेच्या ४ गटांसाठी ६३ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. यात भिलवडी गटात सर्वाधिक १९ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष या गटातील लढतीकडे लागले आहे. दुधोंडी गटाने तर नवा इतिहास रचला असून, येथील सर्वच्या सर्व १६ उमेदवार महिला आहेत. कुंडल आणि अंकलखोप गटात प्रत्येकी १४ अर्ज आले असून येथेही चुरस पाहायला मिळणार आहे. निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीला संथ असलेला अर्जांचा वेग शेवटच्या दोन दिवसांत कमालीचा वाढला. एकट्या शेवटच्या दिवशी पंचायत समितीसाठी ९३ तर जिल्हा परिषदेसाठी ५५ अर्ज प्राप्त झाले. आता माघारीनंतर कोणते दिग्गज रिंगणात राहतात आणि कोणाची 'पॉवर' चालते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Post a Comment

0 Comments