सांगली( सत्यवेध न्यूज )
पंकज गाडे 9890382041
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील प्रसिद्ध मायाक्का चिंचली (ता. बेळगाव) येथील वार्षिक यात्रेला सांगली जिल्हातूनच पावणेदोन लाखांहून अधिक भाविक जात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाला दिली आहे. ही यात्रा मतदानाच्या कालावधीत होत असल्याने मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
दरवर्षी सांगली जिल्ह्यातील पलूस, तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, जत आदी तालुक्यांतून हजारो भाविक बैलगाड्या, ट्रॅक्टर, खासगी वाहने व पायी दिंड्यांनी मायाक्का चिंचली येथे दर्शनासाठी जातात. यंदा मतदानाच्या दिवशीच यात्रेचा मुख्य दिवस येत असल्याने अनेक भाविक दोन ते तीन दिवस गावाबाहेर असण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी याबाबतचा सविस्तर अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर मतदार बाहेरगावी गेल्यास मतदानावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, विविध राजकीय पक्ष व संघटनांकडून मतदानाची तारीख बदलावी अथवा पर्यायी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. याबाबत अंतिम निर्णय निवडणूक आयोगाच्या स्तरावर होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Post a Comment
0 Comments