Type Here to Get Search Results !

अश्रूंमधून उजेड फुलला; भिलवडीतील दोन कुटुंबांनी मृत्यूवरही मानवतेचा विजय सिद्ध केला


भिलवडी(सत्यवेध न्यूज)

पंकज गाडे 9890382041


घरात शोककळा… नातलगांच्या डोळ्यांत अश्रू… आणि त्या अश्रूंमधूनच दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश फुलतो—यालाच खरी माणुसकी म्हणतात. भिलवडी परिसरात सलग दोन दिवसांत घडलेल्या दोन मरणोत्तर नेत्रदानांनी संवेदनशील मने हलवून टाकली आहेत. मृत्यूच्या क्षणीही जीवन देणारा निर्णय घेत दोन कुटुंबांनी समाजासमोर दातृत्वाचा अमर दीप प्रज्वलित केला. या महान कार्यामुळे चार नेत्रहीन व्यक्तींना नवदृष्टी मिळण्याची आशा निर्माण झाली असून भिलवडीतील नेत्रदानाची परंपरा २०९ व २१० या टप्प्यावर पोहोचली आहे.

शनिवार, दि. २४ जानेवारी २०२६ रोजी शिवाजीनगर (माळवाडी), भिलवडी येथील रहिवासी स्व. फंचू आप्पा चिंचवडे (वय ८९) यांनी आयुष्याच्या अखेरच्या श्वासानंतरही समाजासाठी दृष्टीदान करून आपले अस्तित्व अजरामर केले. शांत, साधे आयुष्य जगलेले आप्पा, निधनानंतरही अंधारात हरवलेल्या डोळ्यांत उजेड देऊन गेले.

त्यानंतर रविवार, दि. २५ जानेवारी २०२६ रोजी पाटील गल्ली, भिलवडी येथील रहिवासी स्व.  विठ्ठल रघुनाथ पाटील (वय ४९) यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. चितळे डेअरीमध्ये प्रामाणिकपणे काम करणारे पाटील यांचे आयुष्य अल्प असले, तरी त्यांच्या जाण्याने चार जीवनांना नवी दिशा मिळाली.

हे दोन्ही नेत्रदान जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी यांच्या सहकार्याने अत्यंत संवेदनशीलतेने पार पडले. या चळवळीचे प्रेरणास्थान श्री. गिरीशजी चितळे व श्री. मकरंद चितळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच श्री. संभाजी महिंद, संजय कदम, सुबोध वाळवेकर व गजानन माने यांनी अखेरपर्यंत माणुसकीची साथ दिली.

नेत्रसंकलनाची प्रक्रिया नंदादीप आय बँक, डॉ. पटवर्धन यांच्या माध्यमातून पार पडली. अश्रूंनी डोळे भरलेले असतानाही समाजाचा विचार करून चिंचवडे व पाटील कुटुंबीयांनी घेतलेला हा निर्णय म्हणजे मृत्यूवर मात करणारी मानवतेची साक्ष ठरली आहे.

Post a Comment

0 Comments