भिलवडी( सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041
खटाव ता.पलूस येथील महाबोधी बुद्ध विहारासमोरील सार्वजनिक जागेवर कोणतीही अधिकृत परवानगी न घेता बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याचा गंभीर आरोप समस्त बौद्ध समाज खटाव यांच्यावतीने करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरातील शांतता भंग होण्याची शक्यता निर्माण झाली असून तात्काळ कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
या संदर्भात ग्रामपंचायत व महसूल विभागास दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सदर जागा सार्वजनिक वापरासाठी राखीव असून कोणतीही लेखी परवानगी अथवा शासकीय मंजुरी नसताना जेसीबी व इतर यंत्रसामग्रीच्या साहाय्याने उत्खनन सुरू आहे. या उत्खननामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असून सामाजिक सलोख्यास धोका निर्माण झाला आहे.
वारंवार सूचना देऊनही संबंधितांकडून उत्खनन थांबवण्यात आलेले नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बेकायदेशीर उत्खनन तात्काळ थांबवले नाही, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच परिस्थिती चिघळल्यास अत्यंत टोकाच्या निषेधात्मक मार्गाचा अवलंब करण्याची वेळ येऊ शकते, असा गंभीर इशाराही निवेदनात नमूद करण्यात आला आहे.
या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच बेकायदेशीर उत्खनन त्वरित बंद करावे, अशी ठाम मागणी समस्त बौद्ध समाज खटाव यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती संबंधित प्रशासन व विभागांना देण्यात आल्या आहेत.


Post a Comment
0 Comments