Type Here to Get Search Results !

पलूस शहराचा विकास संपूर्ण देशाला दाखवू – आमदार डॉ. विश्वजीत कदम काँग्रेसच्या प्रचारसभेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद




पलूस (सत्यवेध न्यूज )

पंकज गाडे 9890382041


पुढील पाच वर्षांत पलूस शहराचा विकास संपूर्ण देशाला दाखवू. कोरोना काळातही पलूससाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली. शहराला स्वच्छ, नियमित पाणी मिळावे यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही. पलूसचे सोनं करण्याचे दायित्व आमचे आहे,असे प्रतिपादन आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी काँग्रेसच्या प्रचारसभेत केले.
पलूस नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर काँग्रेसतर्फे आयोजित प्रचारसभा व भव्य रॅली गुरुवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. शहरातील नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर घोषणांनी दुमदुमून गेला.
सभेचे स्वागत माजी गटनेते सुहास पुदाले यांनी केले. माघार घेतलेल्या सर्व उमेदवारांचे त्यांनी विशेष आभार मानत काँग्रेस पॅनल एकसंघ असल्याचा संदेश दिला.


या वेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. संजीवनी सुहास पुदाले तसेच सर्व नगरसेवक उमेदवारांचा परिचय करून देण्यात आला. उमेदवारांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले.
आ. डॉ. कदम यांनी आपल्या भाषणात पलूस शहराचा उल्लेखनीय विकास, शासनस्तरावर मांडलेले स्थानिक प्रश्न, तसेच बंद पडलेली यशवंत पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू करण्यासाठी कै. डॉ. पतंगराव कदम साहेबांनी केलेल्या कार्याचा गौरवपूर्वक उल्लेख केला.
सभेत वैभवराव पुदाले, गिरीश गोंदिल, गणपतराव पुदाले, बाळासाहेब पवार आदींनीही मनोगत व्यक्त करत काँग्रेस पॅनलला भक्कम पाठिंबा देण्याचे आवाहन केले. 


वैभवराव पुदाले म्हणाले,,कै.  डॉ. पतंगराव कदम साहेबांनी पलूसचा कायापालट केला.
नगरपरिषदेच्या सुरुवातीच्या दोन वर्षांत पतंगराव कदम साहेबांचे नेतृत्व लाभले. त्यानंतर बाळासाहेब कदम यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात वाडीवस्तीवरील रस्ते, पाणीपुरवठा, वीजपुरवठा या सर्व मूलभूत सुविधांची पायाभरणी केली..
नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. संजीवनी सुहास पुदाले म्हणाल्या,पलूसमधील सर्व प्रलंबित प्रश्न, नागरिकांच्या अडचणी, विकासकामे यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी आम्ही कामाला लागणार आहोत. सर्वसमावेशक व नियोजनबद्ध विकास हा आमचा निर्धार आहे.


रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांनी गेल्या नऊ वर्षांत नगरपरिषदेमार्फत मोठ्या प्रमाणात निधी आणल्याचा उल्लेख केला. पुढील पन्नास वर्षांचा विचार करून पलूसच्या विकासाचा आराखडा तयार करणार आहोत. काँग्रेस म्हणजे विचारसरणी असून प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःला उमेदवार समजून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आमदार डॉ. विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, जेष्ठ नेते मानसिंगराव पाटील, जे. के. बापू जाधव, बाळासाहेब पवार, उत्तमराव पवार, पलूस बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले, गणपतराव पुदाले, भरतसिंह इनामदार, विशाल दळवी, विक्रम पाटील, गिरीश गोंदिल, माजी नगराध्यक्ष परशुराम शिंदे, गणपतराव सावंत, के. डी. कांबळे, सुशील गोतपागर, शरद शिंदे, डॉ. मीनाक्षी सावंत, वृषाली पुदाले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी तर आभार भरतसिंह इनामदार यांनी मानले.




Post a Comment

0 Comments