Type Here to Get Search Results !

संविधान हाच खरा सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ – प्रा. डॉ. सिसिलिया कार्वालो;औदुंबर (ता. पलूस) येथे ८३ वे सदानंद साहित्य संमेलन उत्साहात संपन्न


औदुंबर (सत्यवेध न्यूज)

पंकज गाडे 9890382041


संविधान हा हाच खरा सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ असून, जेव्हा समाजाला व्यक्त होता येत नाही, समाजाचा आवाज दाबला जातो, तेव्हा लेखकाची लेखणी ही समाजाचा हुंकार बनली पाहिजे, असे प्रतिपादन ८३ व्या सदानंद साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. सिसिलिया कार्वालो यांनी केले.
सदानंद साहित्य मंडळ, औदुंबर यांच्या वतीने आयोजित या साहित्य संमेलनात त्या अध्यक्षीय भाषणात बोलत होत्या. संमेलनाचे उद्घाटन आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी पुढे बोलताना प्रा. डॉ. कार्वालो म्हणाल्या की, भारतातील विविध धर्म, संस्कृती, लोकसाहित्य, देव-देवता व संत परंपरा आपण प्रत्यक्ष पाहिल्या नसल्या, तरी त्या आपल्या जगण्याचा भाग आहेत. वारी म्हणजे सतत वाहणारा प्रवास असून ती लोकजीवनाशी जोडलेली आहे. भाषा ही सामाजिक व रचनात्मक संपत्ती आहे. आईच्या भाषेतूनच मूल समाजाची भाषा शिकते आणि तीच भाषा पुढे विचारांना दिशा देते.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सन २०२५ चा कवी सुधांशु पुरस्कार ईश्वरपूर (जि. सांगली) येथील कवी रवी बावडेकर यांच्या ‘घनघोर काळीजभर’ या काव्यसंग्रहास प्रदान करण्यात आला. तसेच कै. सुरेश कुलकर्णी स्मृती पुरस्कार मुंबई येथील कवयित्री भाग्यश्री फडके यांच्या ‘हिरवे गाणे गावे’ या काव्यसंग्रहास देण्यात आला.
या संमेलनात औदुंबर–अंकलखोप येथील संदीप पवार यांच्या ‘औदुंबर’ या कविता संग्रहाचे, मिरज येथील प्रकाश वायदंडे यांच्या ‘आयुष्याचे पुस्तक माझ्या’ या पुस्तकाचे तसेच आष्टा (ता. वाळवा) येथील लहु कुरणे यांच्या ‘मराठी दलित कथेतील स्त्री जीवन’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमास आमदार डॉ. विश्वजीत कदम, उद्योजक गिरीश चितळे, महेंद्र लाड, सरपंच श्रीमती राजेश्वरी सावंत, उपसरपंच सौ. ज्ञानदेव सूर्यवंशी, विकास सोसायटीचे चेअरमन धनंजय सूर्यवंशी, प्रा. प्रदीप पाटील, प्रा. संतोष काळे,सुदिप गडदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक व स्वागत शहाजी सूर्यवंशी यांनी केले. संमेलनाध्यक्षांचा परिचय सुभाष कवडे यांनी करून दिला. सूत्रसंचालन विभव जोशी यांनी तर आभार प्रदर्शन पुरुषोत्तम जोशी यांनी केले.

Post a Comment

0 Comments