पलूस( सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041
शेतीत आधुनिकतेचा संगम घडवून शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्याचा संदेश देणाऱ्या राज्यस्तरीय ‘यशवंतराव कृषी महोत्सव २०२५’चा भव्य उद्घाटन सोहळा आज पलूस येथे मोठ्या उत्साहात पार पडला.या महोत्सवाचे उद्घाटन सांगली जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मा. संदीप घुगे (IPS) यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीश चितळे यांनी भूषविले.
उद्घाटन सोहळ्यास विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड ऍग्रीकल्चरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, यशवंत ग्लुकोजचे व्हाइस चेअरमन शहाजी (दादा) पाटील, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
आयोजक प्रदीप (आप्पा) कदम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
उद्घाटक मा. संदीप घुगे यांनी आपल्या भाषणात “शेती हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असून शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास शेती अधिक नफा देणारी ठरू शकते,” असे सांगत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांनी कॅश क्रॉप्स, रोपवाटिका, महाविस्तार अॅप आणि यांत्रिकीकरणावर उपयुक्त मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात गिरीश चितळे यांनी “स्पर्धात्मक शेतीसोबतच एकत्रित शेती, फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि डायरेक्ट मार्केटिंग या संकल्पना आत्मसात केल्यास शेतकरी सक्षम होईल,” असा विश्वास व्यक्त केला.
पद्माकर जगदाळे यांनी महोत्सवाचे आयोजन स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले.
प्रताप (नाना) पाटील, शहाजी पाटील आणि इतर मान्यवरांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी संपूर्ण प्रदर्शनाची पाहणी केली. विविध कृषी विभागांच्या माहितीपूर्ण स्टॉल्स, कृषी यंत्रसामग्री आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मांडणीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
संचालन श्रीकांत माने आणि डॉ. उर्मिला यांनी प्रभावीपणे केले, तर अभिजीत सावंत यांनी आभार मानले.


Post a Comment
0 Comments