सांगली जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी मंगळवार दि.४ नोव्हेंबर रोजी भिलवडी पोलीस ठाण्याला वार्षिक तपासणीसाठी भेट दिली. त्यांच्या स्वागतार्थ भिलवडी पोलीस ठाण्याच्या वतीने शिस्तबद्धरित्या सलामी देण्यात आली. तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भवड व भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी पुष्पगुच्छ देऊन बारवकर यांचे स्वागत केले.
या प्रसंगी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने पोलिस पाटील यांच्यासोबत विशेष बैठक घेण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक बारवकर यांनी पोलिस पाटील हे गावपातळीवरील पोलिसांचे प्रमुख दुवा असल्याने त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. त्यांनी गावातील माहिती वेळेवर पोलीस यंत्रणेकडे पोहोचवावी, सामाजिक सलोखा राखावा आणि अफवा किंवा वाद टाळण्यासाठी ग्रामस्थांशी सतत संवाद ठेवावा, अशा सूचना दिल्या.
निवडणूक काळात कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर कृत्य, पैसे किंवा दारूचे वाटप, तसेच जाती-धर्मावर आधारित तणाव निर्माण होऊ नये, यासाठी सतर्क राहण्याचे आवाहनही त्यांनी पोलिस पाटीलांना केले. यावेळी पोलिस पाटील यांच्या अडचणींचीही त्यांनी माहिती घेतली. भविष्यात पोलिस पाटील यांच्यासाठी कायदेशीर अधिकार, जबाबदाऱ्या आणि समन्वय या विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्याचा मानस असल्याचेही बारवकर यांनी सांगितले.
दरम्यान, वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियंत्रण, सूचना फलक, हेल्मेट व सीटबेल्ट वापर, तसेच शाळा-महाविद्यालयांमधून जनजागृती मोहीम राबविण्यावर त्यांनी भर दिला. अपघातप्रवण ठिकाणी नियमित गस्त ठेवून रस्ते सुरक्षा अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
या वेळी तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भवड, सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे यांच्यासह भिलवडी पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी आणि ठाणे हद्दीतील पोलिस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments