भिलवडी(सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041
भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शुक्रवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी वाहतुकीचे नियम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तासगाव वाहतूक नियंत्रण विभाग व भिलवडी पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त गिरीश चितळे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे उपस्थित होते. वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी तासगाव वाहतूक नियंत्रण विभागाचे उपनिरीक्षक आकीब काझी व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
आकीब काझी यांनी विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या पद्धतीने वाहतूक नियम समजावून सांगत लायसन्सविना वाहन चालवू नये, अपघातांपासून सावध राहावे, तसेच “घरी कोणीतरी आपली वाट बघत असतो” ही जाणीव ठेवावी, असा संदेश दिला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी शाळा परिसरातील वाहतूक उपाययोजनांची माहिती देत मोबाईलचे दुष्परिणाम, ऑनलाइन फसवणूक, डिजिटल अरेस्ट यांसारख्या विषयांवरही मार्गदर्शन केले. सोशल मीडियाचा वापर सावधपणे करण्याचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
अध्यक्षीय भाषणात गिरीश चितळे यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानत विद्यार्थ्यांनी स्वतः वाहतूक नियम पाळावेत व घरातील इतरांना देखील त्याचे भान द्यावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांसाठी वाहतूक नियम स्पर्धा घेण्यात आली होती. यात विजेत्यांना सुझुकी शोरूमचे व्यवस्थापक दीपक पाटील यांच्या वतीने हेल्मेट भेट देण्यात आले. मुलींच्या गटात स्वरांजली शिंदे, समीक्षा पाटील, आरती वावरे तर मुलांच्या गटात तन्मय कुंभार, निरंजन परमणे आणि श्रीपाल अवताडे यांनी यश संपादन केले.
कार्यक्रमाला संस्थेचे सचिव मानसिंग हाके, मुख्याध्यापक संजय मोरे, उपमुख्याध्यापक विजय तेली, पर्यवेक्षक विनोद सावंत, पत्रकार शशिकांत राजवंत व पंकज गाडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक साळुंखे सर यांनी केले, पाहुण्यांचा परिचय पी. पी. पाटील यांनी करून दिला. सूत्रसंचालन सौ. भाग्यश्री मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. कवठेकर मॅडम यांनी मानले.
‘वंदे मातरम’ गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून कार्यक्रमाचा समारोप सामूहिक वंदे मातरम गायनाने करण्यात आला.




Post a Comment
0 Comments