पलूस ( सत्यवेध न्यूज )
पंकज गाडे 9890382041
पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते प्रदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजित 'कार्यकर्ता संवाद मेळावा' काल (दिनांक: 9 नोव्हेंबर) पलूस येथे अभूतपूर्व उत्साहात पार पडला. कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह, संघटनेबद्दलची निष्ठा आणि आगामी निवडणुकीसाठीचा विकासाचा स्पष्ट आराखडा या मेळाव्याचे वैशिष्ट्य ठरला.
कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक करताना अभिजीत सावंत यांनी अत्यंत प्रभावी आणि जोशपूर्ण शब्दांत मेळाव्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले. "आज आम्ही केवळ राजकीय चर्चा करण्यासाठी नाही, तर प्रदीप कदम साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या संघटनेला लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्यासाठी एकत्र आलो आहोत," असे उद्गार त्यांनी काढले. पक्ष संघटनेची बळकटी, कार्यकर्त्यांमधील रचनात्मक संवाद आणि तालुक्याच्या विकासाचा २५ वर्षांचा आराखडा तयार करणे, हे या मेळाव्याचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रताप (नाना) पाटील होते. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते प्रदीप कदम यांच्यासह शुभम निकम, आशिष सूर्यवंशी, अभिजीत कौलगे, संजयकुमार शिंदे, अक्षय व्हरे, नंदकुमार निकम, राहुल पाटील, जिनपाल चौगुले, अशोक माने, विकास कदम, अनिल पाटील, उल्लास पाटील, सुयोग पाटील, सत्यजित पिसाळ, विष्णुपंत कदम, सरिता कदम, अर्जुन भांडगे, निवास गायकवाड, सागर मासाळ, विजय परबत, ओमकार परबत, अभिजीत सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
मेळाव्यात शुभम निकम, आशिष सूर्यवंशी, अभिजीत कौलगे, नंदकुमार निकम आणि सरिता कदम यांनी आपल्या मनोगतांतून प्रदीप कदम यांच्या नेतृत्वावर अढळ निष्ठा व्यक्त केली.
"पलूस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मुळे रोवण्याचे आणि राष्ट्रवादी मजबूत करण्याचे काम प्रदीप कदम आप्पांनी मोठ्या कष्टाने केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षीय हित आणि कार्यकर्त्यांचा सन्मान जपत प्रदीप कदम साहेब जो निर्णय घेतील, तो आमच्यासाठी अंतिम आदेश असेल," असा एकमुखी आणि ठाम निर्धार सर्व मनोगतकारांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रताप (नाना) पाटील यांनी आपल्या प्रभावी भाषणात प्रदीप कदम यांच्या कार्याचा गौरव केला. "पलूस तालुक्यातील लोकांच्या हृदयावर राज्य करणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रदीप कदम आहेत. त्यांनी समाजाशी थेट नाळ जोडली आहे," असे ते म्हणाले. रक्तदान शिबिरे, कृषी प्रदर्शन आणि विविध सामाजिक उपक्रम अशा माध्यमांतून प्रदीप कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकांच्या मनात स्थान मिळवले आहे. आगामी निवडणुकांत राष्ट्रवादी अधिक ताकदीने उतरणार असून, "जो राष्ट्रवादीवर प्रेम करतो, तो आमचाच आहे. विश्वास निर्माण करण्यासाठी एकत्रित काम करा," असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रवादीचे पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते प्रदीप कदम यांनी आपल्या भाषणात केवळ राजकारणावर नव्हे, तर विकासावर भर दिला. "पलूस-कुंडल हा भाग नेहमीच क्रांतीचा केंद्रबिंदू राहिला आहे. तालुक्यात राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवल्या असून, सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना संधी देण्याची नवी परंपरा आम्ही निर्माण केली आहे," असे त्यांनी नमूद केले.
प्रदीप (आप्पा) कदम यांनी आपला भविष्यातील संकल्प स्पष्ट करताना सांगितले की, "गेल्या २५ वर्षांचा मागोवा घेत, पुढील २५ वर्षांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. शेतकऱ्यांचा सन्मान आणि युवकांना दिशा देणे हेच आमचे ध्येय आहे. ही निवडणूक केवळ राजकारणासाठी नव्हे, तर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी लढविण्यात येणार आहे." नवीन तरुणांना संधी देऊन तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मेळाव्यात प्रचंड संख्येने उपस्थितअसणाऱ्या युवा, वरिष्ठ व महिला कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या विकासदृष्टीचा वारसा जपण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी प्रभावीपणे केले, तर संजयकुमार शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यकर्त्यांचा उत्साह, प्रचंड उपस्थिती आणि संघटनेबद्दल असलेले प्रेम पाहून संपूर्ण परिसरात या मेळाव्याची जोरदार चर्चा रंगली होती. प्रदीप कदम यांच्या नेतृत्वाखालील या गटाची आगामी काळातली राजकीय वाटचाल अधिक आक्रमक आणि निर्णायक असेल, हे या मेळाव्यातून स्पष्ट झाले आहे.




Post a Comment
0 Comments