विटा ( सत्यवेध न्युज )
पंकज गाडे 9890382041
विटा (ता. खानापूर): सांगली जिल्ह्यातील विटा शहरात आज सकाळी घडलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये गर्भवती महिला आणि दोन वर्षांच्या चिमुरडीचाही समावेश असून या दुर्दैवी घटनेने विटा शहर तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सावरकर नगर परिसरातील एका तीन मजली इमारतीतील इलेक्ट्रॉनिक्स आणि इस्पात दुकानाला आज पहाटेच्या सुमारास आग लागली. काही क्षणांतच ही आग भीषण स्वरूप धारण करत वरच्या मजल्यावरील निवासी भागापर्यंत पोहोचली. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या आगीत विष्णू पांडुरंग जोशी (वय अंदाजे ४५), सुनंदा विष्णू जोशी (वय अंदाजे ३८), त्यांची मुलगी प्रियांका योगेश इंगळे (वय अंदाजे ३०) आणि नात सृष्टी योगेश इंगळे (वय अंदाजे २) या चौघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. प्रियांका इंगळे गर्भवती होती, तसेच तिच्या दोन वर्षांच्या बालिकेचाही आगीत मृत्यू झाला.
दुर्दैवाने, दुकानमालक जोशी यांच्या मुलाचे लग्न सोळा नोव्हेंबरला ठरले होते. लग्नाची संपूर्ण तयारी सुरू होती. लग्नाच्या निमित्तानेच प्रियांका इंगळे विट्यात आली होती. पण या भीषण दुर्घटनेने जोशी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. स्थानिक नागरिक, पोलिस आणि नगरपरिषदेचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. दोन जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण विटा शहरात शोककळा पसरली आहे. नागरिकांनी आगीत बाधित कुटुंबाला प्रशासनाने आर्थिक मदत व सहाय्य द्यावे, अशी मागणी केली आहे.



Post a Comment
0 Comments