सांगली (सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041
दलित महासंघाच्या संस्थापक अध्यक्षांची घरात घुसून गुप्तीने हत्या करण्यात आली असून,हल्लेखोराला जमावाने पकडून बेदम मारल्याने त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली असून,या दुहेरी हत्याकांडाने सांगली हादरली आहे.सदर हत्या प्रकरणी
आठ आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून,काही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, cctv फुटेजच्या आधारे अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. लवकरच सर्वांना अटक करणार पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली ग्वाही.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,
दलित महासंघाचे नेते, मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उत्तम मोहिते दादा यांचा मंगळवार दिनांक ११ नोव्हेंबर रोजी वाढदिवस साजरा करत असतानाच गुप्तीने वार करून खून करण्यात आल्याची भयंकर घटना सांगलीत घडली आहे. मुळशी पॅटर्नप्रमाणे केलेल्या या हत्येने परिसरातील वातावरण अगदी थरारून गेले आहे. उत्तम मोहिते यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा स्वीकारण्यासाठी एक स्टेज उभारण्यात आला होता. जेवणाचा कार्यक्रम ही आयोजित करण्यात आला होता. तेथे शुभेच्छा देऊन संशयित हल्लेखोर शहारुख शेख खाली उतरला. शुभेच्छा देताना त्याचा मोहितेशी वाद झाला होता. त्यानंतर काही वेळाने उत्तम मोहिते घरात गेले असता, गर्दी कमी झाल्याचे पाहून शाहरुख घरात घुसला व त्याने सोबत आणलेल्या गुप्तीने उत्तम मोहिते यांच्यावर पोटात आणि छातीवर जोरदार वार केले. एक वार त्यांच्या हातावरही करण्यात आला आहे. त्यात तो हात तुटल्याचे दिसत आहे.
जखमी मोहिते यांना ताबडतोब सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आणण्यात आले. परंतु तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.उत्तम मोहितेवर भराभर वार करून पळून जाताना शाहरुखला जमलेल्या लोकांनी पकडले. आणि बेडम चोप दिला. गंभीर जखमी असलेल्या शाहरुखलाही सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला आहे. दरम्यान पोलीस ठाण्यात या गुन्ह्यात आठ संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी काहींना ताब्यात घेतले आहे. याशिवाय अन्य काही आरोपी आहेत का याचा cctv फुटेजच्या आधारे पोलीस शोध घेत आहेत. लवकरच सर्व आरोपीना अटक करण्यात येईल अशी माहिती सांगलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकारांना दिली आहे.


Post a Comment
0 Comments