Type Here to Get Search Results !

कविवर्य,अभिनेते आनंद हाबळे यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान


आष्टा ( सत्यवेध न्यूज )
पंकज गाडे 9890382041


मुंबई - वर्ल्ड ह्युमन राइट्स प्रोटेक्शन कमिशन नवी दिल्ली तर्फे सामाजिक व कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सुप्रसिद्ध कवी अभिनेते आनंद हाबळे यांना मंत्रालय,मुंबई येथे सामाजिक न्याय कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली यावेळी भाजप नेत्या,महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्षा चित्राताई वाघ, जनहित लोकशाही पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोकराव आल्हाट डॉ. चंदन कुमार जोगे यांनी आनंद हाबळे यांचे अभिनंदन केले.आनंद हाबळे यांनी गेली चार दशके सामाजिक,साहित्य, कलाक्षेत्रांमध्ये विविध स्तरावर काम करीत आहेत.

आकाशवाणी सांगली वरून युववाणी मध्ये त्यांच्या कवितांचे अनेक कार्यक्रम प्रसारण झाले.त्यांनी महाराष्ट्रातील अखिल भारतीय साहित्य संमेलनापासून अनेक ग्रामीण साहित्य संमेलनात कविता सादर केल्या. तसेच कवीसंमेलन अध्यक्ष, प्रमुख पाहुणे,निमंत्रित कवी, निवेदक म्हणून त्यांनी महाराष्ट्रातील विविध स्तरावरील कार्यक्रमात आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचा अंधार पक्षी (प्रतिनिधी) व वळचणीच पाणी हे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत.तर नवोदित कवी,कवयित्री यांचे काव्यसंग्रह प्रकाशित करून त्यांना साहित्यप्रवाहात आणण्याचे काम केले.

कोल्हापुरातील ऑर्केस्ट्रा वैभव, आकाश, झंकार, धमाका, सुपरस्टार ,ललकार, रंगोली,किशोरकुमार, सुपरस्टार, सुपर मेलडीज स्वर माधुरी अशा अनेक ऑर्केस्ट्रा ,कलापथक मधून निवेदक,मिमिक्री कलाकार म्हणून आपली छाप कायम ठेवली आहे.

आनंद हाबळे यांनी राष्ट्रीय एकात्मता,व्यसनमुक्ती,हुंडाबळी, दारूबंदी, ग्रामस्वच्छताअभियान,शालेय स्वच्छता अभियान, मतदान जनजागृती कार्यक्रम, पर्यावरण, वृक्षारोपण असे अनेक विषय घेऊन समाज परिवर्तनाचे कार्यक्रम राबविले असून महाराष्ट्रातील महाविद्यालय, हायस्कूल व शाळांमधून  एकपात्री प्रयोग व व्याख्यानाचे शेकडो कार्यक्रम यशस्वी केले आहेत.

"अरे संसार संसार" या व्यसनमुक्ती वर आधारित  एकपात्री नाटकाचे महाराष्ट्रभर शेकडो प्रयोग केले त्यामधून शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच अकरा दिवसात एक लाख लोकांना व्यसनमुक्ती व बालविवाह प्रतिबंधाची शपथ देण्याचा संकल्प पूर्ण करून समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला.

चित्रपट निर्माते विलास रकटे यांच्या प्रतिकार व अण्णासाहेब उपाध्ये यांच्या धडकमार या चित्रपटांमध्ये आनंद हाबळे सहाय्यक कलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. कालांतराने महेश बनसोडे निर्मित चल हल्लाबोल या चित्रपटामध्ये (सरपंच) म्हणून प्रमुख भूमिका करण्याची संधी मिळाली त्यासाठी त्यांना कोल्हापूर मराठी चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला. तसेच कलर्स मराठी वरील जीव माझा गुंतला (वकील), आई तुळजाभवानी(असुर गुरू) SUN मराठी वरील संत गजानन शेगावीचे (वैद्य) सुंदरी (सरपंच) आभाळाची माया (गावकरी)जुळली गाठ ग (पत्रकार)या मालिकेत विविध भूमिका केल्या आहेत.प्रेमाची दुनियादारी,बिट्टू भैया या वेब सीरिज,तसेच वणवा,बाटली,जात अशा लघुपटा मध्येही प्रमुख भूमिका करण्याची संधी मिळाली.

साहित्य व कला क्षेत्रातील कवयित्री शांता शेळके, कादंबरीकार बाबा कदम,कवी नारायण सुर्वे, ग्रामीण कथाकार शंकरराव खरात,वामन होवाळ,उपराकार लक्ष्मण माने,नारायण सुमंत,बाबा आढाव,कवी सुधांशू ,ज्येष्ठ विचारवंत आ.ह.साळुंखे,हरी नरके,म.द. हातकलंगलेकर, चक्रवर्ती राजाभाऊ ढाले,प्रा.अरुण कांबळे,ज वि.पवार,डॉ. बाबुराव गुरव,गौतमीपुत्र कांबळे,कवी बापू  घराळ,हास्य कवी अशोक नायगावकर,कवी फ. मु. शिंदे, कवी ज्ञानेश्वर कोळी, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, गीतकार गुलजार,जगदीश खेबुडकर,सुधीर मोघे,संगीतकार बाळ पळसुले,इ.साहित्यिक तसेच अभिनेते निळू फुले,डॉ.श्रीराम लागू,दादा कोंडके,अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे,मोहन जोशी, सूर्यकांत मांढरे,चंद्रकांत मांढरे,रवींद्र महाजनी,राजशेखर, भालचंद्र कुलकर्णी, गणपत पाटील,महेश कोठारे,चेतन दळवी, दिनकर इनामदार,नृत्य दिग्दर्शक प्रकाश हिलगे, लोक गायक विठ्ठल उमप,आनंद शिंदे, मिलिंद शिंदे,विष्णू शिंदे, दिग्दर्शक अनंत माने,राम नगरकर,

तसेच भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले,सुरेश वाडकर,अभिनेत्री आशा पारेख,पूनम धीलो,शबाना आझमी,सुलोचना,अलका कुबल,उषा नाईक,डॉ.निशिगंधा वाड, वर्षा उसगावकर,अलका इनामदार,महिला शाहीर सीमाताई पाटील,शाहीर बजरंग आंबी,अशा अनेक प्रतिभावंतांच्या सहवासातील अनुभव म्हणजेच आनंद हाबळे यांच्या यशाच्या शिखरावरील कळसच होय.

आनंद हाबळे यांनी सामाजिक कार्याबरोबरच कलेची जोपासना करून आपले बी.ए.बी.पी.एड .शिक्षण पूर्ण केले. त्यांनी काही दिवस दानशूर बाळकृष्ण काका पाटील विद्यालय शिगाव, सरस्वती माध्यमिक विद्यालय आकुर्डी पुणे,व आरग हायस्कूल आरग येथे त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. महाराष्ट्र शासन अंगीकृत महिला आर्थिक विकास महामंडळ मुख्यालय,मुंबई येथे प्रसार माध्यम अधिकारी या पदावर काम करीत असताना महाराष्ट्रातील बचत गटातील महिलांच्या यशोगाथा निर्भिड साऱ्या बना ग ! या कार्यक्रमातून 51 भागांची मालिका आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारण करण्याची व बचत गटावर आधारित " सांगाती " या अंकाची जबाबदारी पार पाडली. महाराष्ट्रातील अनेक बचत गटाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात सहभाग घेतला. 

कोल्हापूर जिल्ह्यातील अशोकराव माने पॉलिटेक्निक,वठार तर्फ वडगाव या कॉलेजमधून ते फिजिकल इन्स्टेक्टर म्हणून सेवानिवृत्त झाले.

आनंद हाबळे यांनी आज पर्यंत , पश्चिम महाराष्ट्र साहित्य कला मंच,आष्टा (संस्थापक,अध्यक्ष) धम्म अशोका एज्युकेशन सोशल फाउंडेशन,कोल्हापूर (व्हा.चेअरमन) कालकथित सुरेश कडाळे बुद्धिस्ट सोशल फाउंडेशन,कोल्हापूर (संचालक) नालंदा वाचनालय,आष्टा (संचालक) या पदावर काम करीत असताना अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.

सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातील सव्वालाखी आष्टा या ऐतिहासिक भूमीचे सुपुत्र आनंद हाबळे यांनी पोटाचा खळगा भरण्यासाठी,आपला उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी केलेला हा संघर्षमय प्रवास म्हणजे आजच्या तरुण पिढीसाठी एक आदर्श जीवनपट आहे.


आनंद हाबळे यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल व्यसनमुक्ती कार्यकर्ता पुरस्कार (महाराष्ट्र शासन), कवी वामनदादा कर्डक पुरस्कार, दादासाहेब फाळके मोटिवेशनल अवार्ड, लोकराजा शाहू पुरस्कार, शिवाजीराव शेंडगे पुरस्कार, स्वराज्य भूषण पुरस्कार, महाराष्ट्र कला गौरव पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, समाज रत्न पुरस्कार, कविरत्न पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, भारत गौरव सन्मान, समाजश्री पुरस्कार,कलारत्न पुरस्कार,आई गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्काराने सन्मानित करून शासकीय व निमशासकीय संस्थांनी गौरव केला आहे.


आनंद हाबळे यांना डॉक्टरेट ही पदवी मिळाल्याबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments