Type Here to Get Search Results !

पलूसमध्ये भाजपची दणदणीत शक्तिप्रदर्शन रॅली; सोनाली नलवडे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल...दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीने पलूस राजकारणात वाढली चुरस


पलूस ( सत्यवेध न्यूज )
पंकज गाडे 9890382041



पलूस नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मंगळवारी भव्य शक्तिप्रदर्शन करीत नगराध्यक्षपदासाठी सोनाली सागर नलवडे यांच्या उमेदवारी अर्जाचा तडाखेबंद कार्यक्रम संपन्न केला. या रॅलीमुळे संपूर्ण शहरात निवडणुकीची रंगत चांगलीच वाढली.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सोनाली नलवडे यांनी पलूस शहरातील श्री धोंडिराज महाराज मंदिरात दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. त्यानंतर शहराच्या मुख्य मार्गावरून ढोल-ताशांचा गजर, घोषणांनी दुमदुमलेले वातावरण आणि भगवे झेंडे घेऊन चाललेल्या कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त गर्दीतून ही रॅली निवडणूक शाखेकडे रवाना झाली. महिलांच्या वाढत्या उपस्थितीबरोबरच तरुण कार्यकर्त्यांचा ऊर्जा भरलेला सहभाग रॅलीचे विशेष आकर्षण ठरले.
नगरसेवक पदांसाठीही भाजपच्या विविध विभागातील इच्छुकांनी मोठ्या उत्साहात अर्ज दाखल केले. कार्यकर्त्यांनी ‘विकासासाठी भाजप’ आणि ‘पलूसमध्ये कमळ फुलवा’ अशा घोषणांनी वातावरण प्रफुल्लित केले.



 अर्ज दाखल कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांसारख्या दिग्गज नेत्यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे रॅलीचा प्रभाव अधिक वाढला. याशिवाय उद्योजक सर्जेराव नलवडे, प्रशांत दमामे, मिलिंद पाटील, रामानंद पाटील, संजय येसुगडे, संदीप मोरे, प्रशांत माळी, अमृत माळी, सुरेंद्र चौगुले, उद्योजक गणेश नलवडे तसेच भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



भाजपच्या या भव्य शक्तिप्रदर्शनातून पक्षाने पलूस नगराध्यक्षपदावर आपले लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी निवडणुकीत भाजप आक्रमक पवित्रा घेत असल्याने पलूस नगरपरिषद निवडणूक अत्यंत चुरशीची आणि रोमहर्षक होणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. भाजपच्या या उत्साहपूर्ण रॅलीमुळे विरोधकांमध्ये मात्र तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments