Type Here to Get Search Results !

अज्ञात वाहनाच्या धडकेत भिलवडीतील तरुणाचा मृत्यू...अंकलखोप येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडली घटना


भिलवडी ( सत्यवेध न्यूज )

पंकज गाडे 9890382041

आष्टा–भिलवडी मार्गावरील अंकलखोप येथे अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये भिलवडीतील तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. पुनदिप विक्रम मोकाशी (वय ३३, रा. भिलवडी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

भिलवडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुनदिप मोकाशी हे शनिवारी (१५ नोव्हेंबर) सायंकाळी ७.३० च्या सुमारास होंडा सीडी ११० (एमएच १० डीयू ६८८९) या दुचाकीवरून वारणानगर येथे त्यांच्या ट्रॅक्टरच्या दुरुस्तीचे काम आटोपले आहे का, हे पाहण्यासाठी गेले होते. काम उरकून ते पुन्हा भिलवडीकडे परत येत असताना अंकलखोप येथील अमर पाटील यांच्या जनावरांच्या शेडसमोर अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेमुळे ते रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात पडले. यात त्यांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला.ही घटना १५ नोव्हेंबर रात्री उशिरा ते १६ नोव्हेंबर पहाटेच्या दरम्यान घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रविवारी सकाळी ७ वाजता अमर पाटील यांच्या लक्षात ही घटना आल्यानंतर त्यांनी मृताच्या चुलत भावाला, प्रदीप मोकाशी यांना याची माहिती दिली. तत्काळ नातेवाईकांनी पुनदिप यांना खाजगी रुग्णवाहिकेतून भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.सदर घटनेची फिर्याद प्रदीप उत्तम मोकाशी यांनी भिलवडी पोलिसात दाखल केली असून, अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्राथमिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महेश घस्ते यांनी केला असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे करीत आहेत.भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 


Post a Comment

0 Comments