Type Here to Get Search Results !

भिलवडी – प्रा.आ.केंद्राची ॲम्बुलन्स धोकादायक अवस्थेत; झिजलेल्या टायरमुळे नागरिकांच्या रोषाचा भडका, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह



भिलवडी ( सत्यवेध न्यूज )
पंकज गाडे 9890382041


भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (PHC) ताब्यातील ॲम्बुलन्सची अत्यंत जीर्ण अवस्था उघड झाल्यानंतर गावात आणि परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. जीव वाचवण्यासाठी धावणारी ही ॲम्बुलन्स स्वतःच रुग्णांच्या जीवाला धोका ठरण्याइतकी खराब स्थितीत असल्याचे उघडकीस आले आहे. वाहनाचे टायर पूर्णपणे झिजले असून त्यावरील पकड जवळपास नाहीशी झाली आहे. कोणत्याही क्षणी टायर फुटून अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रामस्थांनी घेतलेल्या छायाचित्रांमध्ये टायरचे उखडलेले रबर आणि धोकादायक स्थिती स्पष्टपणे दिसत आहे. “अशी ॲम्बुलन्स रस्त्यावर धावत असणे ही गंभीर बेपर्वाई आहे. हे वाहन रुग्णांना वाचवणार की त्यांच्या जीवाला धोका आणणार?” असा सवाल ग्रामस्थ संतापून विचारत आहेत. गावभर या निष्काळजीपणाची जोरदार चर्चा सुरू असून आरोग्य विभागावर टीकेची झोड उठली आहे.
भिलवडीसह आसपासच्या गावांतील अनेक रुग्णांना  ही ॲम्बुलन्स सेवा पुरवते. गंभीर रुग्णांना सांगली व मिरज येथे हलवताना टायर फुटल्यास मोठा अपघात होऊ शकतो, यामुळे उपचाराआधीच रुग्णाचा जीव धोक्यात येण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. “जीवन-मरणाच्या प्रश्नात सुरक्षित वाहन आवश्यक आहे, पण येथे मात्र एखाद्या जुगारासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे,” अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांनी आरोग्य विभागाकडे तातडीने सर्व टायर बदलण्याची आणि वाहन दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. “निधी नाही, जबाबदारी नाही—मग रुग्णांचा जीव तरी कोणाकडे सोपवायचा?” असा प्रश्नही ते उपस्थित करत आहेत. स्थानिक पातळीवर या विषयावर मोठी चर्चा सुरू असून प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास नागरिक आंदोलनाचा इशाराही देत आहेत.

Post a Comment

0 Comments