पलूस(सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041
स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती आयोजित ‘यशवंतराव कृषी महोत्सव २०२५’ चा दिमाखदार शुभारंभ पलूस येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कृषी आणि तंत्रज्ञानाचा संगम असलेल्या या भव्य महोत्सवाने शेतकरी वर्गामध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. समितीचे अध्यक्ष आणि प्रमुख आयोजक प्रदीप आप्पा कदम यांनी या महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधव आणि नागरिकांना आवाहन केले.
या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले आहे कर्नाटकातून आलेला ‘हिंद केसरी’ किताब पटकावलेला महाकाय रेडा ‘गजेंद्र’. बेळगाव जिल्ह्यातील मंगसुळी (ता. कागवाड) येथील विलास गणपती नाईक यांच्या मालकीचा हा १२ वर्षांचा रेडा तब्बल दीड टन वजनाचा असून, त्याने आतापर्यंत ७० पेक्षा अधिक कृषी प्रदर्शनांमध्ये सहभाग नोंदवला आहे.
गजेंद्रच्या देखण्या रूपामुळे आणि अफाट ताकदीमुळे नागरिकांची मोठी गर्दी त्याला पाहण्यासाठी होत आहे. विशेष म्हणजे, या रेड्यासाठी सुमारे दीड कोटी रुपयांची किंमत येऊन गेल्याची माहिती मालक विलास नाईक यांनी दिली. गजेंद्रच्या दैनंदिन शाही खुराकात १५ किलो दूध, ४ किलो पेंड, २-३ किलो सफरचंद, ३ किलो आटा, तसेच ऊस, मक्का आणि गवत यांचा समावेश असतो. दररोजचा त्याचा खर्च तब्बल २ हजार रुपयांहून अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले.
उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रदीप कदम म्हणाले, “महाराष्ट्राच्या कृषी आणि औद्योगिक विकासात यशवंतराव चव्हाण यांचे योगदान अपार आहे. त्यांच्या स्मृतीला उजाळा देत, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या कृषी संकल्पना समजाव्यात या उद्देशाने हा महोत्सव आयोजित केला आहे.”
या महोत्सवात विविध कृषी उपकरणे, बियाणे, आधुनिक सिंचन पद्धती, तसेच पशुपालन आणि दुग्धव्यवसायाशी संबंधित प्रदर्शनांनाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पुढील काही दिवसांत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चर्चासत्रे आणि कृषी विषयक प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहेत.


Post a Comment
0 Comments