Type Here to Get Search Results !

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि निर्यातक्षम केळी उत्पादनावर शेतकऱ्यांचे मार्गदर्शन सत्र उत्साहात संपन्न...राज्यस्तरीय यशवंतराव कृषी महोत्सव २०२५ डिजिटल शेतीकडे वाटचाल!


पलूस(सत्यवेध न्यूज)

पंकज गाडे 9890382041



राज्यस्तरीय यशवंतराव कृषी महोत्सव २०२५ अंतर्गत रविवार, दि. २ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सत्रात “कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) शेती तंत्रज्ञान” आणि “निर्यातक्षम केळी पीक व्यवस्थापन” या विषयांवर आयोजित मार्गदर्शन सत्र शेतकऱ्यांच्या प्रचंड प्रतिसादात पार पडले. आधुनिक शेती आणि जागतिक बाजारपेठेतील संधी या दोन्ही विषयांचा संगम साधणाऱ्या या सत्राने शेतकऱ्यांना ज्ञान आणि प्रेरणा दोन्ही दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत माने व डॉ. निर्मला यांनी केले. स्वागत कृषिभूषण रवी पाटील यांनी केले, तर आयोजक प्रदीप कदम यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. “AI म्हणजेच डिजिटल शेतीचा आधारस्तंभ” असल्याचे त्यांनी सांगितले.
AI तज्ञ ऋषिकेश राठोड यांनी आपल्या प्रभावी सादरीकरणातून कृत्रिम बुद्धिमत्ता शेतीत कशी क्रांती घडवते याचे सविस्तर मार्गदर्शन केले. AI च्या साहाय्याने पिकांवरील रोग, कीड व अन्नद्रव्यांची कमतरता वेळीच ओळखणे, अचूक फवारणी व सिंचन व्यवस्थापन करणे, हवामानाचा अंदाज घेऊन पेरणी व काढणीचे निर्णय घेणे अशा अनेक प्रगत तंत्रांचा त्यांनी ऊहापोह केला. “AI तंत्रज्ञानामुळे उत्पादन खर्च कमी होऊन नफा वाढतो,” असेही त्यांनी नमूद केले.
यानंतर सुरेश मगदूम यांनी निर्यातक्षम केळी उत्पादन व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. निर्यातीसाठी ‘ग्रँड नैन’ सारख्या टिश्यू कल्चर रोपांची निवड, ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन, जमीन निवड, फळांचे विरळणीकरण, तसेच बॅगिंग तंत्रज्ञान या बाबींवर त्यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच “निर्यातीसाठी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार पॅकेजिंग आणि वाहतूक व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी कृषिभूषण प्रशांत पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. उपस्थित शेतकरी बांधवांनी या सत्रातून आधुनिक शेती आणि डिजिटल तंत्रज्ञानाची सांगड घालण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले.


Post a Comment

0 Comments