सांगली ( सत्यवेध न्यूज )
पंकज गाड़े 9890382041
सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेतील एल.ई.डी. स्ट्रीट लाईट प्रकल्पातील भ्रष्टाचार आणि अनियमिततेच्या विरोधात दलित महासंघाच्या वतीने हातामध्ये बल्ब व ट्यूब घेऊन ‘लाईट्स मोर्चा’ काढण्यात आला.मनपाने शहरात २५ हजार एल.ई.डी. स्ट्रीट लाईट बसविण्याचा प्रकल्प हाती घेतला असून, त्यासाठी तब्बल १६८ कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी तीन वर्षांसाठी ४८ कोटी रुपये आगाऊ देण्यात आले आहेत.अशी माहिती देवून, बाजारभावानुसार या दिव्यांचा खर्च फक्त सुमारे ७ कोटी रुपये इतका होत असताना मनपाने १६१ कोटी रुपये जादा देण्याचे कारण काय, असा प्रश्न दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उत्तमदादा मोहिते यांनी केला आहे.त्याचबरोबर सदर प्रकल्पाचा ठेका पुण्यातील समुद्रा कंपनीला देण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात कंपनी सांगलीतील स्थानिक व्यक्तींमार्फत चालविली जात असल्याचा तसेच कंपनीकडे प्रशिक्षित कर्मचारी नसून टेंडर प्रक्रियेतही पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोपही डॉ.उत्तमदादा मोहिते यांनी केला आहे.
मनपाच्या विद्युत विभागाचे अभियंता अमर चव्हाण हे २००३ पासून एकाच पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या विरोधात पूर्वीपासूनच अनेक भ्रष्टाचाराच्या तक्रारी असून, सध्या एसआयटी चौकशी सुरू आहे. तरीदेखील त्यांनी या कंपनीला ठेका दिला, तसेच स्वतःच बिलांची मंजुरी दिल्याचा आरोप करीत सांगलीवाडी येथील शाळेत सीसीटीव्ही बसविण्याच्या खोट्या बिलाचाही मुद्दा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तमदादा मोहिते यांनी उचलून धरला.
गेल्या पंधरा दिवसांपासून मनपा हद्दीतील एल.ई.डी. स्ट्रीट लाईट दिवस-रात्र चालू असल्याने अनावश्यक वीजबिलाचा भार नागरिकांच्या खिशातून जाणार का, याची चौकशी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
या आंदोलनाच्या माध्यमातून या सर्व प्रकरणाची सीआयडी चौकशी, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करणे, तसेच समुद्रा कंपनीचा ठेका रद्द करून लाखो रुपयांचा दंड ठोठावणे या मागण्या मोहिते यांनी केल्या आहेत.
शुक्रवार दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी गारपीर चौक येथून निघालेला मोर्चा राम मंदिर मार्गे स्टेशन चौकातून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका कार्यालयावर जाऊन संपन्न झाला.
यावेळी महानगरपालिका कार्यालयावर आलेल्या आंदोलकांना गेटच्या आत शिरण्यास मज्जाव केल्यानंतर आक्रमक झालेल्या दलित महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आतमध्ये घुसून महापालिका प्रवेशद्वारासमोर सुमारे दोन तास ठिय्या मांडून आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय येथून न उठण्याचा निर्णय घेतला परंतू उपायुक्त राहुल रोकडे यांनी आंदोलकांची भूमिका जाणून घेत, संबंधित मागण्याचा गांभीर्याने विचार करून, दोषीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदरचे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले.
या मोर्चाचे नेतृत्व दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उत्तमदादा मोहिते यांनी केले. यावेळी युवक राज्याध्यक्ष टिपू पटवेगार,
रमेश चौगुले,
सांगली जिल्हा संपर्क प्रमुख युनूस भैय्या कोल्हापूरे, निशांत आवळेकर,गुरूनाथ धाबडे, अरमान तांबोळी,नसीर चौगुले,तोसिफ शेख, अर्जुन मोहिते,
वैभव कोले, रोहित उर्फ पिलू वारे, गणेश वारे,स्वप्निल कांबळे,सोन्या हालगीवाला,अमित वारे, हातकणंगले तालुका अध्यक्ष अमर लोंढे, प्रदिप लोंढे, संतोष चौगुले,भारत लोंढे, राहूल लोंढे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मोर्चादरम्यान “भ्रष्टाचारमुक्त मनपा हवी”, “दिवसा चांदण्या दाखविणारे अधिकारी हद्दपार करा” अशा घोषणा देत दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली.




Post a Comment
0 Comments