भिलवडी( सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041
जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून लावणारी मोठी घडामोड घडणार आहे. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निष्ठावान नेते अरुण (अण्णा) लाड यांचे सुपुत्र शरद लाड भाजपच्या वाटेवर असून येत्या मंगळवार, ७ ऑक्टोबर रोजी त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाल्याची माहिती भाजपच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
शरद लाड यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला, विशेषतः जिल्ह्याचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसणार आहे. अरुण अण्णा लाड हे जयंत पाटील यांचे विश्वासू मानले जात असल्याने भाजपने त्यांच्या सुपुत्रालाच पक्षात खेचणे ही थेट राजकीय खेळी ठरत असल्याची चर्चा सांगलीच्या राजकारणात रंगली आहे.
अलीकडेच विजयादशमीच्या मुहूर्तावर सांगलीत झालेल्या दुर्गामाता दौड सोहळ्यात शरद लाड यांनी उपस्थिती दर्शवली होती. याचवेळी त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते. आता मात्र या चर्चेला अधिकृत शिक्कामोर्तब झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही हिरवा कंदील मिळाल्याचे समजते.
या प्रवेशानंतर सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या गोटात चिंता निर्माण झाली असून, भाजपने केलेली ही राजकीय चाल जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला मोठे आव्हान ठरणार, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

Post a Comment
0 Comments