Type Here to Get Search Results !

जिद्दीने जिंकला संघर्ष – सांगली पोलिसांनी परत आणला आईचा जीव!”



सांगली( सत्यवेध न्यूज)

पंकज गाडे ९८९०३८२०४१


सांगलीतील विश्रामबाग चौकातून अपहरण झालेला एक वर्षाचा साहिल तब्बल चार दिवसानंतर आईच्या कुशीत विसावला आहे. शहरातील पोलीस प्रशासनाचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असतानाही पोलिसांच्या अथक प्रयत्नाला शुक्रवारी यश आले. आईच्या कुशीत विसावलेल्या साहिलला पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी मिठाई चारून आनंद व्यक्त केला. तर बागरी दाम्पत्याच्या चेहऱ्यावरील आनंद पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना दिसत होता. साहिल याला रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथून शोधून काढण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. याप्रकरणी मिरजेतील एकाला अटक करण्यात आली असून, या अपहरणाचे मुख्य सूत्रधार असलेले दाम्पत्य फरार झाले आहे. त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी दिली. इनायत अब्दुल सत्तार गोलंदाज (वय वर्षे ४३, रा. किल्ला भाग, मिरज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर इम्तियाज पठाण आणि वसीमा इम्तियाज पठाण हे पसार झाले आहेत.सोमवार दि. २० ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री दहानंतर विश्रामबाग चौकातून अज्ञातांनी साहिल (वय १ वर्ष) याचे अपहरण केले होते. पहाटेपर्यंत साहिल न सापडल्याने त्याच्या पालकांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.



त्यानंतर पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव गुन्हे प्रकटीकरण शाखेसह पोलिसांना साहिलचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या. तर एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतिश शिंदे सुट्टीवर असतानाही त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्यासह पथक तयार करून साहिलच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके पाठवली.शहरातील प्रशासनाचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने साहिलचा शोध घेण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या. तर दुसरीकडे लक्ष्मीपूजन असल्याने व्यापाऱ्यांनीही तातडीने मदत करण्यास नकार दिला होता. तरीही पोलिसांनी त्यांचे प्रयत्न सुरूच ठेवले. शहरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज शोधूनही साहिलचे अपहरण करणाऱ्यांचा मागमूस मिळत नव्हता. एलसीबीकडील संदीप नलावडे, आमिरशा फकीर यांना इनायत गोलंदाज तसेच पठाण दाम्पत्याने साहिलचे अपहरण केल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. एलसीबीच्या पथकाने तातडीने मिरजेतून इनायत याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने पठाण दाम्पत्याने साहिलचे अपहरण केल्याची कबुली दिली तसेच इनायतने स्वतः रत्नागिरी जिल्ह्यातील राजेशिर्के यांना मूलबाळ नसल्याने त्यांच्याकडे साहिलला दिल्याचीही कबुली दिली.

पथकाने तातडीने सावर्डे येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने साहिलला ताब्यात घेतले. तसेच इनायतला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी पठाण दाम्पत्याचा युद्धपातळीवर शोध सुरू केला आहे. तब्बल चार दिवसानंतर साहिल आईच्या कुशीत विसावल्यानंतर पोलीस पथकाने सुटकेचा निःश्वास सोडला. ऐन दिवाळीचा सण सोडून एलसीबी आणि विश्रामबागचे पथक साहिलच्या शोधात फिरत होते. साहिल सापडल्यानंतर पोलिसांच्या चेहऱ्यावरील आनंदही बरेच काही सांगून जात होता.

पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अपर अधिक्षक कल्पना बारवकर, एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतिश शिंदे, विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, सपना गराडे, संदीप नलावडे, आमिरशा फकीर, सागर लवटे, संदीप गुरव, मच्छिंद्र बर्डे, अमर नरळे, उदयसिंह माळी, महादेव नागणे, सुनिता शेजाळे, विक्रम खोत, विनायक सुतार, सुशील मस्के, सोमनाथ पतंगे, विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील बिरोबा नरळे, प्रशांत माळी, महम्मद मुलाणी, आर्यन देशिंगकर, योगेश पाटील, सायबर पोलिस ठाण्याकडील अभिजित पाटील, अजय पाटील, रत्नागिरीच्या सावर्डे पोलिस ठाण्याकडील गंगनेष पट्टेकर, उमेश कांबळे, साधना ओमासे यांनी या कारवाईत भाग घेतला.

Post a Comment

0 Comments