भिलवडी(सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041
खंडोबाचीवाडी ता. पलूस येथे
शेतकऱ्यांमध्ये वैज्ञानिक पशुपालनाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, तसेच गाभण गायींच्या काळजी व पोषणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी गोदरेज पशू आहार कंपनीतर्फे ‘गाभणकाळ व्यवस्थापन’ हा जनजागृती उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत बुधवार, दिनांक १५ ऑक्टोबर रोजी खंडोबाचीवाडी येथे गाभण गायींसाठी पारंपरिक पद्धतीने “गौ मातृत्व गौरव सोहळा म्हणजेच डोहाळे जेवण” साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात गाभण गायींच्या पूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली. मंगलगाणी म्हणत गावातील महिलांनी गायींचे पारंपरिक पद्धतीने ओवाळून स्वागत केले. साडीचोळी नेसवून, फुलांच्या माळा चढवून, संतुलित पशुखाद्य व पारंपरिक डोहाळे जेवण ठेवून गाभण गायींचा सण साजरा करण्यात आला.
या वेळी गोदरेज पशू आहारचे विक्री व्यवस्थापक डॉ. मिलिंद शिंदे, पोषण विभाग प्रमुख डॉ. मयूरी धुमाळ, जाहिरात प्रमुख सुनिता मुंडे, वरिष्ठ अधिकारी सुनिल लाड, विभागीय अधिकारी निलेश पाटील, रणजीत देसाई, तसेच जानकी ट्रेडर्सचे प्रमुख राजेंद्र पोतदार, रोहित पोतदार आणि रितेश कांबळे प्रमुख उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
तज्ज्ञांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, गाभण गायींना योग्य संतुलित पोषण दिल्यास वासरू निरोगी जन्माला येते आणि दुधाचे प्रमाण तसेच गुणवत्ता वाढते. गाभण काळातील पोषण, खनिजे, जीवनसत्त्वे, प्रथिनेयुक्त आहार आणि गोदरेजच्या हिप्पर फीड, ट्रांझी फीड विषयीही सविस्तर माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांना “गाभण गायींसाठी संतुलित आहार” या माहितीपत्रकाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले बबन आत्माराम सावंत यांच्या गायीचे पारंपरिक डोहाळे जेवण. महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम घेऊन त्यांना गोदरेज कंपनीतर्फे आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.
शेवटी गोदरेज पशू आहारतर्फे “आरोग्यदायी माता – उत्पादनक्षम पशुधन” ही संकल्पना मांडण्यात आली. ग्रामस्थांनी या अभिनव उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिल लाड यांनी केले, तर आभार सुनिता मुंडे यांनी मानले.
या वेळी खंडेश्वरी सहकारी पाणीपुरवठा संस्था नं. २ चे चेअरमन लालासो सावंत, बाळासाहेब सावंत, बाळासाहेब खोत, मोहन खोत, उत्तम जाधव, प्रकाश बाबर, विश्रांती सावंत, उज्वला सावंत, सविता सावंत, सुचिता जाधव, उज्वला शिंदे, वासंती सावंत आदींसह शेकडो महिला व शेतकरी उपस्थित होते.




Post a Comment
0 Comments