Type Here to Get Search Results !

संकट सांगून येत नाही, पण सरकार सदैव सज्ज आहे” — चंद्रकांत दादा पाटील;औदुंबर येथे यांत्रिक बोटींचा लोकार्पण सोहळा उत्साहात

 


भिलवडी/औदुंबर (सत्यवेध न्यूज)

पंकज गाडे 9890382041


जिल्हा नियोजन समिती, सांगली व जिल्हा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने औदुंबर येथे यांत्रिक बोटींचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास राज्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, आमदार डॉ. विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील यांसह जिल्ह्यातील अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “जिल्ह्यातील २३ बोटींपैकी ८ आज देण्यात आल्या असून आणखी ४ बोटी देण्याचे मान्य केले आहे. कोणतेही संकट सांगून येत नाही, त्यामुळे त्याची पूर्वतयारी असणे आवश्यक आहे. या बोटींसाठी डॉ. विश्वजीत कदम यांनी सातत्याने पाठपुरावा केला. लोकशाही करू शकते ते सामान्य करू शकत नाहीत; त्यामुळे सरकार संकटाच्या वेळी मदतीला धावते.”



ते पुढे म्हणाले, “अतिवृष्टीमुळे १.५ लाख एकर शेतीचे नुकसान झाले असून सरकारने शेतकऱ्यांना ४१ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. २०१९ मध्ये मदत व पुनर्वसन मंत्री म्हणून काम करताना सांगली जिल्ह्यातील ३ लाख लोकांचे स्थलांतर करण्यात आले होते. भविष्यातील पूरस्थिती लक्षात घेऊन काही गावांची रचना उंचावर करावी का, याचा विचार सुरू आहे. बोटींसारख्या अनेक उपाययोजना राबविण्याची आवश्यकता आहे.”



खासदार विशाल पाटील म्हणाले, “औदुंबर, अंकलखोप, भिलवडी, सुखवाडी, चोपडेवाडी या भागांमध्ये दरवर्षी पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे या बोटींची गरज भासू नये, अशीच प्रार्थना आहे. २०१९ च्या महापुरात स्व. डॉ. पतंगराव कदम यांची उणीव डॉ. विश्वजीत कदम यांनी भरून काढली.”



आमदार डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, “कृष्णा नदीकाठच्या गावांना वारंवार पुराचा फटका बसतो. पात्र अरुंद असल्याने पाण्याचा मारा अधिक होतो. या भागासाठी यांत्रिक बोटींची गरज अनेक वर्षांपासून होती. मी सातत्याने यासाठी प्रयत्न केले. दादा (चंद्रकांत पाटील) यांनी तात्काळ मान्यता देऊन बोटी उपलब्ध करून दिल्या, याबद्दल त्यांचे मनापासून आभार. १९८५ साली स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या काळात घाट बांधला गेला होता. आता त्याच्या विस्तारीकरणासाठी सरकारचे सहकार्य अपेक्षित आहे.”

ते पुढे म्हणाले, “औदुंबर येथे दरवर्षी भाविकांची प्रचंड गर्दी होते. गुरूदेव दत्तांचे व भुवनेश्वरीदेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्यांच्या सोयीसाठी झुलता पूल उभारण्याची आवश्यकता आहे,” अशी मागणीही त्यांनी केली.

कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक काकडे, उपजिल्हाधिकारी तेजस्विनी नरवाडे, पोलिस अधीक्षक संदिप घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, प्रांताधिकारी रणजीत भोसले, तहसीलदार मनोहर नांदे-पाटील, गटविकास अधिकारी राजेश कदम, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, जे.के. बापू जाधव, बी.डी.पाटील, प्रणाली पाटील, सरपंच ओंकार पाटील, बाळासो यादव ,राजश्री सावंत,अमर वडार, ऐनुद्दीन उर्फ चया जमादार आदी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments