कडेगाव ( सत्यवेध न्यूज )
पंकज गाडे 9890382041
"जनतेच्या हिताची व विकासाची कामे करीत असताना, अधिकाऱ्यांनी कोणतेही चुकीचे काम केले, तर याद राखा, कोणाचीही गय केली जाणार नाही. लोकांवर अन्याय होता कामा नये, तो खपवून घेतला जाणार नाही," असा सज्जड दम आमदार विश्वजित कदम यांनी अधिकाऱ्यांना दिला.
येथे पलूस, कडेगाव तालुक्यांच्या आयोजित आमसभेत आमदार विश्वजित कदम बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, महेंद्र लाड, प्रांताधिकारी रणजित भोसले आदी उपस्थित होते. ही आमसभा तब्बल १० तास चालली. त्यामुळे उपस्थित सर्व नागरिकांना आपले प्रश्न सविस्तरपणे मांडता आले.
कडेगाव नगरपंचायतीच्या विकास आराखड्याबाबत नागरिकांच्या प्रश्नांवर आमदार कदम यांनी मुख्याधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले, "विकास आराखड्याबाबत नागरिकांच्या हरकती असतील, तर तो विकास आराखडा मंजूर होऊ शकत नाही. यावर मुख्याधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करावी; अन्यथा तुम्ही जबाबदार राहाल. सर्व नागरिक व लोकप्रतिनिधींना विचारात न घेता आराखडा कसा मंजूर झाला? माझ्या तालुक्यात मला न विचारता कोणतेही चुकीचे काम केले, तर याद राखा."
वसगडे (ता. पलूस) येथील रेल्वे मार्गावर बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे लवकरच लोकार्पण केले जाईल, त्यामुळे या मार्गावरील प्रवासी वर्गाची होणारी अडचण दूर होईल.
खासदार विशाल पाटील म्हणाले, "आमसभा हे समस्या मांडण्याचे लोकांचे हक्काचे व्यासपीठ आहे. या सभेत लोकांनी उपस्थित केलेले सर्व समस्या व प्रश्नांची संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ सोडवणूक करावी."
याप्रसंगी पलूस, कडेगाव तालुक्यांतील रस्ते, वीजपुरवठा, शेतरस्ते, ताकारी, टेंभू पाणी प्रश्न, रेशन कार्यासाठी लागणारा विलंब, रोहयो कामातील विलंब व त्रुटी, शासकीय कार्यालयातील अनागोंदी कारभार, एसटीचे प्रश्न तसेच बसस्थानकातील स्वच्छतागृहांची दुरवस्था, आरोग्य विभागाचे प्रश्न, पलूस नगरपालिका, कडेगाव नगरपंचायत, पलूस-कडेगाव तालुक्यांतील सर्व ग्रामपंचायतीचे प्रश्न,यासह विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आदी विविध प्रश्नांबाबत वादळी चर्चा झाली. नागरिकांनी शासकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीचा पाढाच वाचला.यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष भीमराव मोहिते, जितेश कदम, जे. के. बापू जाधव, अंकलखोपच्या सरपंच राजेश्वरी सावंत, सतीश पाटील, तहसीलदार अजित शेलार, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, पलूसचे राजेश कदम, कडेगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे, पलूसच्या मुख्याधिकारी निर्मला राशिनकर, 'सोनहिरा'चे संचालक दीपक भोसले, नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते विजय शिंदे, सुरेश थोरात, सरपंच संतोष करांडे, विनायक पवार यांच्यासह सर्व शासकीय विभागाचे अधिकारी, पलूस कडेगाव तालुक्यांतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment
0 Comments