Type Here to Get Search Results !

तासगावजवळ भीषण अपघात : बुर्लीचे आजी-आजोबा व नातू ठार, चार शिक्षक जखमी






भिलवडी( सत्यवेध न्यूज  )

पंकज गाडे 9890382041


तासगाव-भिलवडी मार्गावर चेतना पेट्रोलपंपाजवळ रविवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात बुर्ली (ता. पलूस) येथील आजी-आजोबा व त्यांच्या पाच वर्षांच्या नातवाचा जागीच मृत्यू झाला. तर वॅग्नार कारमधील चार शिक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तासगाव व सांगली येथील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

मृतांमध्ये शिवाजी बापू सुतार (57), आशाताई शिवाजी सुतार (55) व वैष्णव ईश्वर सुतार (5, नातू) यांचा समावेश आहे. हे तिघेजण नातेवाइकांना भेटून दुचाकीवरून परतत असताना अपघाताला बळी पडले.

अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीतील एका शिक्षण संस्थेतील चार शिक्षक वॅग्नार कार (एमएच-10 ईए 6540) मधून कडेपूर येथे आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यासाठी गेले होते. सांगलीवाडी येथील स्वाती अमित कोळी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर शिक्षक परतत असताना त्यांच्या कारची समोरून येणाऱ्या दुचाकीशी (एमएच-10 बी 7174) भीषण धडक झाली. धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या खालील द्राक्षबागेत कोसळली.

या अपघातात कारमधील पूजा राघवेंद्र कुलकर्णी, सूरज पवार, स्वाती अमित कोळी आणि आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाले. तातडीने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. सुदैवाने चौघेही मृत्यूपासून बचावले आहेत.

अपघाताची बातमी कळताच तासगाव शहरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.या अपघातामुळे तासगाव व पलूस तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, एका वृद्ध दांम्पत्यासह लहान नातवाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. दरम्यान, पुरस्कार सोहळ्यात सहभागी झालेल्या शिक्षकांच्या कारला अपघात झाल्याने शिक्षक समाजातही दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments