Type Here to Get Search Results !

भिलवडी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची सुरुवात

 



भिलवडी(बंधुता वृत्तसेवा)
पंकज गाडे 9890382041

भिलवडी ता. पलूस येथे
महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची सुरुवात बुधवार दिनांक १० सप्टेंबर रोजी भिलवडी गावातून करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून या अभियानाचा शुभारंभ झाला.
उपस्थितांचे स्वागत ग्रामविकास अधिकारी कैलास केदारे यांनी केले.तर प्रास्ताविक पलूस पंचायत समितीचे विस्ताराधिकारी दिनेश खाडे यांनी केले.यामध्ये तालुक्यातील चांगल्या कामाची सुरुवात चांगल्या गावातून करावी या उद्देशाने भिलवडी गावाची निवड करण्यात आली असून, भिलवडी गाव हे नेहमीच सर्व उपक्रमांमध्ये अग्रेसर राहिले आहे त्यामुळे हे अभियान यशस्वी करण्यासाठी भिलवडी येथील नागरिक सर्वस्वी प्रयत्न करतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला व अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाविषयी व त्याच्या गुणाविषयी त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी या अभियानाचे महत्त्व अधोरेखित केले. गटविकास अधिकारी राजेश कदम म्हणाले की, “या अभियानामध्ये असा एकही उपक्रम किंवा प्रश्न नाही जो आपण सोडवू शकणार नाही. फक्त आपण शंभर टक्के सहभाग आणि काम करण्याची तयारी दाखवली पाहिजे. हे माझे अभियान आहे, माझ्या गावाचे आहे, माझ्या देशाचे आहे असा विचार मनात ठेवून, आपण पूर्ण क्षमतेने काम केल्यास गावाच्या सर्व विकासाच्या समस्या सुटतील. तसेच आपल्या गावाचा नावलौकिक राज्यात होईल, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब ठरेल.”




या अभियानातून ग्रामविकास, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा, महिला व बालकल्याण, शेतीपूरक उपक्रम, रोजगार निर्मिती आदी क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. गावातील प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे ठरणार असून या सामूहिक प्रयत्नातून भिलवडी गाव विकासाचे एक आदर्श मॉडेल म्हणून उभे राहील, असा विश्वासही गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी व्यक्त केला.




यावेळी बाळासाहेब मोरे,बी डी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, पलूस कडेगाव चे भाग्यविधाते विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजीत कदम यांनी स्व निधीतून जाहीर केलेले एक कोटी रुपयांचे बक्षीस हे आपल्या घरात म्हणजे भिलवडी गावातच राहील यासाठी सर्वत्र प्रयत्न करणार असल्याची खात्री उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिली. यावेळी सांगली जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय येवले, भिलवडी गावच्या सरपंच शबाना हारुण रशिद मुल्ला, चंद्रकांत (भाऊ) पाटील, शहाजी (भाऊ) गुरव, पृथ्वीराज पाटील,ऐनुद्दीन उर्फ चया जमादार,पांडुरंग टकले, मुसा शेख, सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक संजय मोरे सर, मोहन तावदर, सचिन पाटील, रशिद मुल्ला,भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोहर कांबळे, डॉ. सुमित साळुंखे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments