Type Here to Get Search Results !

कदम साहेबांचे अपुरे स्वप्न विश्वजीत कदम पूर्ण करतील – आ. वडेट्टीवार


कडेगाव(सत्यवेध न्यूज)

पंकज गाडे 9890382041


डॉ. पतंगराव कदम साहेब हे बिनधास्तपणे काम करणारे, सामन्यातील असामान्य व्यक्तिमत्त्व होते. शिक्षण, समाजकारण अशा विविध कार्यातून त्यांनी राज्यभर आपली वेगळी ओळख निर्माण केली. जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत त्यांचे कार्य स्मरणात राहील,” असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री व विरोधी पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.





डॉ. पतंगराव कदम यांच्या ‘लोकतीर्थ’ स्मारक लोकार्पणाच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आ. सतेज पाटील, माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील, विजयमाला कदम, डॉ. अस्मिता जगताप, माजी आमदार विक्रम सावंत, स्वप्नालीताई कदम, सागरेश्वर सूतगिरणीचे चेअरमन डॉ. शांताराम कदम, महेंद्र लाड, डॉ. जितेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.




आ. वडेट्टीवार पुढे म्हणाले, “डॉ. कदम हे शेती व मातीशी नातं जपणारे व्यक्तिमत्त्व होते. कोणतेही काम करण्यासाठी गेलो की कधीच निराशा झाली नाही. पण आजच्या राजकारणात ती परिस्थिती राहिलेली नाही. वारसाने आलेले टिकवणे अवघड असते, मात्र आ. डॉ. विश्वजीत कदम ही जबाबदारी लिलया पार पाडत आहेत. महाराष्ट्राचे भविष्यातील नेतृत्व करण्याची ताकद त्यांच्यात आहे व ते डॉ. कदम साहेबांचे अपुरे स्वप्न पूर्ण करतील,” असे ते म्हणाले.



आ. सतेज पाटील म्हणाले, “कदम साहेब हे दिलखुलास व्यक्तिमत्त्व होते. स्वकर्तृत्वातून त्यांनी देशाच्या राजकारणात दबदबा निर्माण केला. त्यांनी घेतलेले लोकोपयोगी निर्णय पुढील शंभर वर्षे स्मरणात राहतील. कदम साहेबांनंतर काय, याचे उत्तर विश्वजीत कदम यांच्या रूपाने मिळाले आहे. त्यांचे नेतृत्व मोठे करणे ही आपली जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले.


खासदार विशाल पाटील यांनी यावेळी सांगितले, “डॉ. कदम यांनी आयुष्यभर काँग्रेसच्या विचारांची पेरणी केली. निष्ठा काय असते ते त्यांच्याकडून शिकावे. कृष्णेचे पाणी या भागात आणण्याचे कार्य हे त्यांचे ऐतिहासिक योगदान आहे,” असे ते म्हणाले.




कार्यक्रमात आ. डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, “या परिसरात ताकारी व टेंभू योजना यशस्वी होऊन गावोगावी पाणी पोहोचले, त्याचे श्रेय स्व. डॉ. पतंगराव कदम यांनाच जाते. हा इतिहास आहे आणि इतिहास कधी बदलता येत नाही. आयुष्यभर त्यांनी गोरगरीबांसाठी कार्य केले. त्यांच्या विचारांची परंपरा टिकवण्यासाठीच लोकतीर्थ उभारले आहे. पलूस-कडेगाव मतदारसंघातील प्रत्येक घर हे माझे कुटुंब आहे आणि त्यांच्यासाठीच मी कार्यरत आहे,” असे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक डॉ. जितेश कदम यांनी केले. 



कार्यक्रमास डॉ. विजय होनमाने, जे. के. बापू जाधव, उत्तमराव पवार, सुरेश निर्मळ, डॉ. इंद्रजीत मोहिते, रघुनाथ कदम, ऋषिकेश लाड, नगरसेवक रामचंद्र कदम, युवक नेते दिग्विजय कदम, सागर कदम, आदित्य कदम, हर्षवर्धन कदम, जयदीप भोसले,अविनाश काळीबाग, प्रमोद जाधव, प्रणाली पाटील, मालन मोहिते, सुनिल जगदाळे, सिकंदर जामदार यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केले.

Post a Comment

0 Comments