Type Here to Get Search Results !

प्रांताधिकारी रणजीत भोसले यांच्या कन्येचे अपघाती निधन; परिसरात शोककळा



भिलवडी(सत्यवेध न्यूज)

पंकज गाडे 9890382041

पलूस-कडेगावचे प्रांताधिकारी रणजीत भोसले यांच्या कन्या इक्षिता रणजीत भोसले (वय ६) हिचे बुधवारी (दि. ३ सप्टेंबर) झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेने सांगली व सातारा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इक्षिता आपल्या आजी-आजोबांसमवेत चारचाकी गाडीने राजवडी (ता. माण, जि. सातारा) येथून पंढरपूरकडे देवदर्शनासाठी निघाली होती. दुपारी तीनच्या सुमारास पंढरपूर महामार्गावर गाडी दुभाजकाला जोरदार धडकली. या अपघातात इक्षिता गंभीर जखमी झाली. तिला तत्काळ अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. गाडीत एकूण पाच जण होते. त्यापैकी चार जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.

गुरुवार (दि. ४ सप्टेंबर) सकाळी दहा वाजता राजवडी येथे शोकाकुल वातावरणात इक्षिताचा अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी नातेवाईक, मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्षाविसर्जन कार्यक्रम शुक्रवार (दि. ५ सप्टेंबर) सकाळी आठ वाजता राजवडी येथे होणार आहे.

मंगळवारी (दि. २ सप्टेंबर)च इक्षिताचा वाढदिवस आनंदात साजरा झाला होता. वाढदिवसानंतर केवळ दुसऱ्याच दिवशी झालेल्या या अपघाताने भोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. इक्षिताच्या अकाली जाण्याने परिसरात सर्वत्र शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments