Type Here to Get Search Results !

भिलवडी स्टेशनजवळ भीषण अपघात; दुधाचा टँकर पलटी, दोघांचा मृत्यू



भिलवडी(सत्यवेध न्यूज)

पंकज गाडे


पलूस तालुक्यातील भिलवडी स्टेशन जवळील चेंडगे मळा खंडोबाचीवाडी येथील बस थांब्यासमोर दुधाने भरलेला टँकर पलटी झाल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली आहे.
भिलवडी पोलीस ठाणे व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सांगली येथील सुशील गोरवाडे यांच्या टँकर क्रमांक एम.एच.१० झेड ९०००  या दूध वाहतूक करणाऱ्या टँकरवर प्रशांत दिलीप देवकुळे वय वर्ष २३ राहणार नेहरूनगर निमणी हा दोन वर्षापासून चालक म्हणून काम करीत होता. सोमवार दि. २२ सप्टेंबर २०२५ रोजी प्रशांत व त्याच्या आत्तीचा मुलगा तेजस सुशील भोरे वय वर्षे १९ राहणार नेहरूनगर निमणी याच्यासह 
सरूड वडगाव ता.शिराळा येथील समाधान दुध डेअरी येथून दूध घेऊन, भिलवडी स्टेशन येथील चितळे डेअरीकडे येत असताना मंगळवार दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास भिलवडी स्टेशन नजीक असणाऱ्या चेंडगे मळा खंडोबाचीवाडी येथील बस थांब्याजवळ आले असता, चालकाचा टँकर वरील ताबा सुटल्याने, टँकर रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाला. यामध्ये प्रशांत देवकुळे व तेजस भोरे हे दोघेही टँकरच्या केबिनमध्ये अडकून गंभीर जखमी झाले. या अपघातामध्ये टँकर केबिनचा अक्षरशः चक्काचूर झाला. त्याचबरोबर हा टँकर येथील लोक वस्तीतील दोन कुटुंबाच्या शौचालय व बाथरूमवरती पडल्याने त्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने लोक वस्तीतील कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली तसेच क्रेनच्या सहाय्याने टँकर बाहेर काढून,नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी  जखमींना तातडीने भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता, तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी संबंधित जखमी मयत झाल्याचे सांगितले.
यावेळी घटनास्थळावरती लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
सदर घटनेची फिर्याद मयत टँकर चालक प्रशांत देवकुळे याचे वडील दिलीप जयवंत देवकुळे यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात दिली आहे. सदर घटनेचा अधिक तपास भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे हे करीत आहेत.

फोटो- मयत
१) प्रशांत देवकुळे
२)तेजस भोरे

Post a Comment

0 Comments