भिलवडी ( सत्यवेध न्यूज )
पंकज गाडे 9890382041
माढा तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले, घरदार वाहून गेले… अशा कठीण काळात औदुंबरच्या श्री दत्त देवस्थान ट्रस्टने पुढाकार घेत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिलासा पोहोचवला. ट्रस्टसोबत श्री राजेश चौगुले फाउंडेशन, श्री म्हसोबा अन्नछत्र मंडळ व सुखकर्ता गणेशोत्सव मंडळ सांगली यांनी एकत्र येऊन तब्बल साडेचारशे कुटुंबांना संसारोपयोगी साहित्याचे किट वाटप केले. प्रत्येक किटची किंमत सुमारे एक हजार रुपये इतकी होती.
औदुंबरचे दत्तभक्त नेहमीच सामाजिक कार्यात पुढे असतात. पूरग्रस्तांच्या हातात किट देताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते, पण त्या अश्रूंमध्ये दिलासा व कृतज्ञता दोन्ही दाटून आलेली होती. घरातील धान्य, कपडे, भांडी पाण्यात वाहून गेल्यानंतर अचानक उभी राहिलेली पोकळी या किटमुळे काही प्रमाणात भरून निघाल्याचे त्यांनी भावुक होऊन सांगितले.
मदत कार्यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब सूर्यवंशी, देवस्थान संस्थापक धनंजय सूर्यवंशी, अध्यक्ष संतोष पाटील, विश्वस्त अमर पाटील, गौरव पाटील, वैभव सूर्यवंशी, विजय पाटील, प्रणव देशपांडे, पत्रकार महेश चौगुले, सामाजिक कार्यकर्ते सुशांत सूर्यवंशी, राजेंद्र कुंभार, श्री मसोबा अन्नछत्र मंडळाचे सुनील चौगुले व ग्रामस्थ उपस्थित होते.
“पूराने आमचं सर्वस्व नेलं, पण औदुंबरच्या दत्तभक्तांनी आम्हाला जगण्याचा आधार दिला. हा देवच माणसांच्या रूपाने मदतीला आला आहे,” असे एका वृद्ध शेतकऱ्याचे डोळ्यांत पाणी आणणारे शब्द उपस्थितांनाही भावले.
औदुंबरच्या सामाजिक संस्थांनी उचललेला हा मोलाचा पुढाकार माढा तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी नव्या आशेचा किरण ठरला आहे.
Post a Comment
0 Comments