Type Here to Get Search Results !

४० फूट शिखर आणि अप्रतिम शिल्पकला : भुवनेश्वरी मंदिराचा वैभवशाली इतिहास”

 भिलवडी (सत्यवेध न्यूज)

पंकज गाडे 9890382041


भिलवडी (ता. पलूस) :भिलवडीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर कृष्णाकाठावर वसलेले श्री भुवनेश्वरी देवीचे हेमाडपंथी मंदिर हे १२ व्या शतकातील प्राचीन व ऐतिहासिक शक्तीपीठ आहे. डौलदार दगडी बांधणी, ४० फूट उंच शिखर, अप्रतिम शिल्पकला आणि अध्यात्मिक तेजाने नटलेले हे मंदिर भक्तांच्या श्रद्धेचा दीप कायम प्रज्वलित ठेवत आले आहे. मंदिराच्या समोर  दोन डिकमली असून, देवीच्या गाभाऱ्यासमोर अंगरक्षक भैरवनाथाचे छोटे पण प्रभावी मंदिरही आहे.


*देवीचे रूप व वैशिष्ट्य*

गाभाऱ्यात विराजमान असलेली ४ फूट उंच भुवनेश्वरी माता पार्वतीचे रूप धारण करून भक्तांना दर्शन देते. चार भुजांमध्ये शंख, चक्र, गदा व कमळ धारण केलेली ही मूर्ती मनातील अंध:कार दूर करून भक्तांना धैर्य व समाधानाचा आशीर्वाद देते. काळ्या दगडावर कोरलेली ४ फूट उंचीची ही मूर्ती दगडी शिल्पकलेचा देखणा नमुना आहे. मंदिराचे शिखर श्री यंत्रावर आधारित असल्याने येथे आल्यावर भक्तांना वेगळी अध्यात्मिक ऊर्जा लाभते, असा अनुभव भाविक सांगतात.


*नवरात्र व पौर्णिमा उत्सवाचे आकर्षण*

दर पौर्णिमेला मंदिरात महापूजा व प्रसाद वाटप होते. पूजेचा मान गुरव समाजाकडे आहे. पोष पौर्णिमा व नवरात्रोत्सव हा तर भक्तांसाठी खऱ्या अर्थाने पर्वणीच असते. त्या काळात मंदिर परिसर भक्तांनी गजबजून जातो. महिलांची मोठी उपस्थिती, अखंड सुरू असलेली देवीभजने, ढोल-ताशांचा गजर, दीपमालेत चमकणारे हजारो दिवे – या वातावरणामुळे मंदिर परिसर भाविकांसाठी स्वर्गीय भासतो.


*पालखी परंपरा व सांस्कृतिक वारसा*

भुवनेश्वरी मातेची पालखी वर्षातून पाच वेळा निघते. या पालखीत सहभागी होणे हे भक्तांसाठी मोठे भाग्य मानले जाते. पालखीच्या वेळी पंचक्रोशीतील गावकरी सामूहिकरित्या सहभागी होतात. यामुळे फक्त धार्मिकच नव्हे तर सामाजिक एकतेचाही संदेश मिळतो.


मंदिर परिसरात कालभैरव, गणपती, महादेव, हनुमान, यम आणि संत ज्ञानेश्वर यांसारखी मंदिरे असल्याने हे ठिकाण एक धार्मिक संकुल म्हणून ओळखले जाते. दिवाळीच्या दिवसांत उंचावलेली दीपमाला पेटवल्यावर संपूर्ण परिसर उजळून निघतो आणि भाविकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळतात.


*श्रद्धा, परंपरा आणि एकजूट*


हे मंदिर फक्त उपासनेसाठी नसून श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेचे जतन करणारे केंद्र आहे. येथे होणारे उत्सव समाजातील सर्व घटकांना एकत्र आणतात. कृष्णाकाठावर उभे असलेले हे शक्तीपीठ आजही हजारो भक्तांसाठी मानसिक आधार, आत्मिक शक्ती आणि अध्यात्मिक प्रेरणेचा अखंड झरा आहे.


“आई भुवनेश्वरीच्या दर्शनाने आयुष्याला बळ, मनाला शांती आणि आत्म्याला समाधान लाभते,” असा अनुभव अनेक भाविक व्यक्त करतात.

Post a Comment

0 Comments