Type Here to Get Search Results !

नांदणीच्या ‘माधुरी’ हत्तीणीसाठी अंकलखोपमध्ये मूक मोर्चा;न्यायालयाच्या एकतर्फी निर्णयाविरोधात संतप्त भावना; ‘माधुरी’ला परत आणण्याची जोरदार मागणी


अंकलखोप (सत्यवेध न्यूज)

पंकज गाडे 9890382041



 दि.६   नांदणी मठाची हत्तीण ‘माधुरी’ (उर्फ महादेवी) हिला गुजरातमधील ‘वनतारा’ प्रकल्पातून परत आणण्याच्या मागणीसाठी अंकलखोप ता.पलूस  येथे मंगळवारी सायंकाळी मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात स्थानिक नागरिक, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून झाली. येथे महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. पुढे गुरव गल्लीतील माजी आमदार दत्ताजीराव सूर्यवंशी यांच्या पुतळ्याला, बसवेश्वर चौकात बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याला, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करण्यात आले.




या मूक मोर्चात सहभागी झालेल्यांनी ‘पेटा’ संस्थेच्या चुकीच्या अहवालामुळे व न्यायालयाच्या एकतर्फी निर्णयामुळे माधुरीला वनतारा येथे पाठवण्यात आल्याचा आरोप केला. हत्तीणीच्या मूळ ठिकाणी असलेली नाळ जुळलेली असून, तिला दूर पाठविल्यामुळे तिच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर परिणाम होण्याची भीतीही यावेळी व्यक्त करण्यात आली.
मोर्चात जयकुमार कोल्हे, अमित कुंभोजकर, प्रमोद नवले, धनंजय सूर्यवंशी, शितल बिरनाळे, रवी बिरनाळे यांच्यासह महिलांचा व अंकलखोप गावातील ग्रामस्थांचा, तसेच सर्व समाजातील नागरिकांचा मोठा सहभाग होता.
मोर्चाचा शेवट पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ झाला. या ठिकाणी मूक मोर्चाचा शांततेत समारोप करण्यात आला.

Post a Comment

0 Comments