भिलवडी ( सत्यवेध न्यूज )
पंकज गाडे 9890382041
पूरग्रस्त भागांमध्ये नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी झटणाऱ्या आशा सेविकांचा आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी विशेष गौरव केला. भिलवडी येथे पूरस्थितीचा आढावा घेताना त्यांनी आशा सेविकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांचे काम पाहिले आणि म्हटले, "तुम्ही लोकांची काळजी घेत आहात, पण स्वतःच्या आरोग्याचीही तितकीच काळजी घ्या. कारण तुमच्यामुळे अनेक नागरिक सुरक्षित राहणार आहेत."
पूरस्थितीनंतर साथीच्या आजारांचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर आशा सेविका घराघरात जाऊन तपासणी, औषधांचे वाटप, लसीकरण, स्वच्छता जनजागृती आणि महिलां-बालकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. त्यांचे हे अथक कार्य पाहून आमदार कदम यांनी समाधान व्यक्त केले.
कदम म्हणाले, "तुमच्यासारखे आरोग्य सैनिक गावोगाव कार्यरत असल्यामुळेच प्रशासनाला दिलासा मिळतो. पूरकाळातील आव्हानात्मक परिस्थितीतही तुम्ही दाखविलेली तत्परता प्रेरणादायी आहे."भेटीदरम्यान आरोग्य विभागातील इतर अधिकारी, कर्मचारी व स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. पूरग्रस्त भागातील नागरिकांना योग्य आरोग्यसेवा पुरविण्यासाठी आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही आमदार कदम यांनी दिले.
Post a Comment
0 Comments