भिलवडी(सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041
सांगलीतील शासकीय रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये २५ ते ३० वर्षांपासून सेवा बजावत असलेल्या न्यायालयीन बदली कामगारांना कायम न करता रिक्त पदांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया सुरू केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
या संदर्भात वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे शिष्टमंडळाने मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा निवड समिती सांगली यांना निवेदन सादर केले. या निवेदनात नमूद केले आहे की, मुंबई उच्च न्यायालयाच्या मॅट कोर्ट तसेच सांगली लेबर कोर्ट यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रथम न्यायालयीन बदली कामगारांना कायम करणे बंधनकारक आहे. मात्र प्रशासनाने या आदेशांकडे दुर्लक्ष करून थेट भरती प्रक्रिया राबवली आहे.
युनियनच्या प्रमुख मागण्या
1. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे रिक्त जागांवर प्रथम न्यायालयीन बदली कामगारांना कायम करावे.
2. उर्वरित जागांसाठीच सरळसेवा भरती प्रक्रिया राबवावी.
3. वर्षानुवर्ष चालत आलेले अन्यायकारक वर्तन तातडीने थांबवावे.
कायदेशीर कारवाईचा इशारा
यनियनने इशारा दिला आहे की, प्रशासनाने भरती प्रक्रिया सुरूच ठेवली तर संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि झालेल्या नुकसानीस जिल्हाधिकारी, अधिष्ठाता तसेच रुग्णालय प्रशासन जबाबदार राहील. या प्रसंगी प्रशांत वाघमारे, संजय भूपाल कांबळे, संजय संपत कांबळे, जगदिश कांबळे, अनिल मोरे, रूपेश तामगावकर यांच्यासह मोठ्या संख्येने न्यायालयीन बदली कामगार उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments