Type Here to Get Search Results !

मोरया चा जयघोष व गुलाल पेढयांच्या उधळणीत तासगावचा रथोत्सव उत्साहात हजारो गणेशभक्तांची उपस्थिती, पोलिसांचा जागता पहारा, रथोत्सव शांततेत




तासगाव(सत्यवेध न्यूज)

पंकज गाडे 9890382041


गुलाल, पेढ्यांची उधळण मोरया मोरया असा तरुणाईचा जयघोष , व हजारो गणेशभक्तांच्या साक्षीने तासगावचा २४६ वा ऐतिहासिक रथोत्सव रविवारी उत्साहात संपन्न झाला. गणेशभक्तांच्या उपस्थितीने तासगाव शहर फूलून गेले होते. सकाळी सहा वाजल्यापासूनच गणपती मंदिरात दर्शनासाठी भक्तांची झुंबड उडाली होती. पटवर्धन संस्थानच्या दीड दिवसाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन पावणे चार वाजता झाले. पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे  कोणताही अनुचीत प्रकार न होता रथोत्सव सुरळीत पार पडला. तासगावच्या वाहतूक विभागाने वाहतुकीची उत्तम व्यावस्था ठेवली होती.

तासगावचा गणपती उजव्या सोंडेचा असून तो नवसाला पावतो. अशी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातही ख्याती आहे. गणपती पंचायतन व पटवर्धन संस्थानच्या या रथोत्सवास २४६ वर्षांची परंपरा आहे. ९६ फूटी  गोपुर, तीन मजली , तीस फुट उंचीचा व चार चाकी रथ गणेशभक्तानी दोरखंडाच्या सहाय्याने ओढण्याची महाराष्ट्रातील एकमेव परंपरा आहे.




सार्वजनिक रथोत्सवाची सुरवात परशुरामभाऊ पटवर्धन यांनी लोकमान्य टिळक यांच्या अगोदरच तासगाव येथून केली होती. सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन हा रथ ओढण्याची परंपरा आहे . कोणताही भेदभाव न होता हा रथोत्सव सामाजिक ऐक्याची प्रेरणा देतो.  बुधवारी वाजत गाजत तासगाव संस्थानच्या दीड दिवसाच्या शाडूच्या मातीच्या मातीच्या मुर्तीची मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना झाली. तर गुरुवारी सकाळी राजवाडयात श्रीमंत राजेंद्र पटवर्धन व डॉ अदितीताई पटवर्धन यांच्या हस्ते आरती झाली. दुपारी १ वाजून ७ मिनिटांनी वादयाच्या गजरात पालखीमधून मातीच्या मुर्तीचे व ऐतिहासिक १२५ किलोंच्या पंचधातूच्या मुर्तीचे राजवाडयातून प्रस्थान  झाले.

पालखीसमोर पारंपारिक गोंधळी, होलार व कैकाडी समाज मानाने वादन करीत होता. तर संस्थानची गौरी हत्तीण दिमाखात डोलत चालत होती. गणेशमूर्ती मंदिरात आल्यावर तिची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. आरती नंतर दोन्ही मुर्त्या पालखीत ठेवण्यात आल्या. संस्थानचा रथ केळीचे खूंट, फुलांच्या माळा व नारळाच्या तोरणानी सजवला होता. नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असल्याने रथास तोरण बांधण्यासाठी  गणेश भक्तांची  झुंबड उडाली होती.

गणेश मंडळांसह अनेकांनी मंदिराबाहेर प्रसाद वाटपाचे स्टॉल उभारले होते. रथासमोर अनेक झांज पथक व गोविंदा मंडळानी आपल्या कला सादर करत रथास मानवंदना दिली. मातीच्या व पंचधातुच्या मूर्ती रथामधे ठेवण्यात आली. पटवर्धन कुटुंबियांनी आरती म्हणल्यानंतर १ वाजून १९ मिनिटांनी रथोत्सवास सुरवात झाली. झांज पथकाचा ठेका, मोरया, मोरया असा जयघोष व गुलाल पेढयांच्या उधळनीत  रथ ओढन्यास सुरवात झाली. मात्र सुरुवातीला तरुणांनी हुल्लडबाजपणा केल्याने रथ रस्त्याच्या बाजूला लोखंडी खांबास धडकला. मात्र  त्यानंतर योग्य नियोजननंतर रथ पुन्हा मार्गस्थ झाला. रथाचे सारथ्य श्रीमंत राजेंद्र पटवर्धन व डॉ अदितीताई पटवर्धन व कुटुंबियांनी केले.


दुपारी १ नंतर भाविकांमधे वाढ झाली. गणपतीबाप्पा रथात बसून  मंदिरापासून १ किलोमीटर अंतरावर असलेल्या काशी विश्वेश्वर मंदिरात आपले वडील भगवान् शंकर  यांना भेटण्यास जातात. त्या ठिकाणी दोघांची भेट होते. भेट झाल्यानंतर पंचधातूची व शाडूची मूर्ती कापुर ओढ्यानजीक विहरीपर्यन्त जाते.त्यानंतर आरती करुन शास्त्रशुद्ध पद्धतीने मातीच्या मुर्तीचे तेथे विसर्जन झाले. त्यानंतर रथाचा परतीच्या प्रवास सुरु  झाला. ५ तास रथोत्सवाची मिरवणूक चालली. व २४६ वा तासगावचा ऐतिहासिक रथोत्सव उत्साहात व शांततेत पार पडला. रथोत्सवास  मंत्री शंभूराजे देसाई, माजी खासदार संजय पाटील, आमदार रोहित पाटील, युवा नेते प्रभाकर पाटील, दलित महासंघ मोहिते गटाचे राज्यअध्यक्ष प्रशांत केदार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सांगली जिल्हा संघटक अमोल काळे, यश फार्मर प्रोड्युसर कंपनीचे   विजय कुंभार यांनी भेट देऊन पाहणी करत गणेश भक्तांना शुभेछ्या दिल्या.



चौकट

 राजेंद्र पटवर्धन व अदितीताई पटवर्धन यांचे सारथ्य: तासगावच्या  ऐतिहासिक रथोत्सवासाठी श्रीमंत राजेंद्र पटवर्धन व अदितीताई पटवर्धन यांनी यशस्वी सारथ्य केले. गेल्या काही वर्षात रथावर होणारे वाद व त्यामुळे रथोत्सवास गालबोट लागत असे. मात्र यावर्षी कोणतेही वाद न होता रथोत्सव शांततेत पार पडला.

Post a Comment

0 Comments