Type Here to Get Search Results !

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारती विद्यापीठाचा पुढाकार मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २ कोटींचा धनादेश सुपूर्द


भिलवडी(सत्यवेध न्यूज)

पंकज गाडे 9890382041


राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर भारती विद्यापीठाने सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल २ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे.

हा धनादेश माजी मंत्री तथा आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी भारती विद्यापीठाचे कुलपती मा. डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, तसेच कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप उपस्थित होत्या.

या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार डॉ. विश्वजित कदम आणि उपस्थित मान्यवर यांच्यात राज्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि विकासाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक धोरणात्मक निर्णय, जनतेच्या अपेक्षा आणि समाजातील विविध घटकांच्या प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवरही विचारमंथन करण्यात आले.

या संदर्भात बोलताना आमदार डॉ. विश्वजित कदम म्हणाले, “महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे आणि त्यांच्या संकटकाळात आपण त्यांच्या सोबत राहिले पाहिजे, हे तत्व स्व. डॉ. पतंगराव कदम यांनी नेहमीच जपले. त्यांच्या या आदर्शाचा वारसा पुढे नेत भारती विद्यापीठाने पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी हे पाऊल उचलले आहे.”

यापूर्वीही भारती परिवाराकडून पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात मदत करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा ‘स्व. डॉ. पतंगराव कदम आपत्ती निवारण निधी’ तून २ कोटी रुपयांची देणगी देऊन भारती विद्यापीठाने आपल्या सामाजिक जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे.

Post a Comment

0 Comments