औदुंबर(सत्यवेध न्यूज) पंकज गाडे ९८९०३८२०४१
दि. २८ औदुंबर, ता. पलूस (जि. सांगली), सोमवार, २८ जुलै — कृष्णा नदीला आलेल्या जोरदार पूरामुळे औदुंबर येथील प्रसिद्ध श्री क्षेत्र दत्त मंदिर तसेच नागठाणे बांधारा पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. आज पहाटेपासून मंदिर परिसर जलमय झाल्याने दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय झाली आहे, तर नागठाणे बांधारा परिसरात वाहतूक बंद करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोयना व वारणा धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. त्याचा थेट परिणाम औदुंबर परिसरावर झाला असून, आज पहाटेच्या सुमारास नदीचे पाणी थेट मंदिराच्या आवारात शिरले.
पूरस्थितीमुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंदिर प्रशासन व स्थानिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून, पूर ओसरत नाही तोपर्यंत धार्मिक कार्यक्रम व दर्शन मर्यादित ठेवण्यात आले आहेत.
नागठाणे बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला असून, त्या मार्गावरील रस्ता प्रशासनाने बंद केला आहे. परिसरात अजून पावसाची शक्यता असल्यामुळे सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्थानिक प्रशासनाने भाविक व नागरिकांना सुरक्षित स्थळी थांबण्याचे आवाहन केले आहे. तसेच नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Post a Comment
0 Comments