*शिराळा (सत्यवेध न्यूज)*
पंकज गाडे 9890382041
जगप्रसिद्ध नागपंचमी उत्सव बत्तीस शिराळा येथे यंदा शांततेत, शिस्तबद्ध आणि भक्तिभावाने पार पडला. न्यायालयीन अटी आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, फक्त 21 निवडक ग्रामस्थांना शैक्षणिक व जनजागृतीच्या उद्देशाने जिवंत सर्प हाताळण्याची माफक परवानगी देण्यात आली होती.
उत्सवाची सुरुवात पांडुरंग महाजन यांच्या घरी पारंपरिक पालखी पूजनाने झाली. त्यानंतर रामचंद्र महाजन यांच्या घरी पूजन होऊन प्रतीकात्मक नागाची मिरवणूक काढण्यात आली. पूर्वी जिवंत नागांनाच पूजले जात असे, परंतु सध्या न्यायालयाच्या आदेशामुळे प्रतीकात्मक सर्पपूजनाच्या रूपाने परंपरा जपली जात आहे.
महिलांचा यंदा प्रथमच ढोल पथकात सहभाग विशेष आकर्षण ठरला. सुमारे 500 पोलीस, 135 वन कर्मचारी, 7 चेकपोस्ट्स, 20 सीसीटीव्ही, 17 ध्वनीमापक यंत्रणा व ड्रोनच्या सहाय्याने प्रशासनाने सुरक्षेची चोख व्यवस्था केली होती. एसटी महामंडळाकडून 40 अतिरिक्त बस सोडण्यात आल्या, तर आरोग्य विभागाने 7 वैद्यकीय आणि 32 फिरती पथके सज्ज ठेवली होती.नगरपंचायतीकडून वीज आणि स्वच्छतेची कार्यक्षम व्यवस्था करण्यात आली. हजारो भाविकांनी यात्रेला उपस्थिती लावली. संपूर्ण उत्सवामध्ये श्रद्धा, पारंपरिक संस्कृती आणि सर्पसंवर्धनाचा संदेश प्रभावीपणे अधोरेखित झाला.बत्तीस शिराळ्याचा नागपंचमी उत्सव हा सामाजिक एकजूट, पर्यावरणपूरक दृष्टिकोन आणि सांस्कृतिक वारशाचे जतन यांचा आदर्श ठरत आहे.
Post a Comment
0 Comments