Type Here to Get Search Results !

केळी शेती शाश्वत उत्पन्नाचा पर्याय – सुधाकर दमामे



अंकलखोप (सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041


"शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सध्या केळी शेती हा एक उत्तम पर्याय ठरतो आहे. योग्य नियोजन, शास्त्रीय पद्धती आणि योग्य सल्ल्याच्या आधारे केळी शेतीतून भरघोस उत्पन्न मिळू शकते. मात्र अनाठायी खर्च, चुकीच्या सल्ल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणून शेतकऱ्यांनी संघटितपणे काम करावे आणि अनुभवसंपन्न तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा," असे आवाहन *पोलन अ‍ॅग्रो मिनरल प्रा. लि.*चे विस्तार अधिकारी सुधाकर दमामे यांनी केले.



अंकलखोप येथील विकास सोसायटीच्या सभागृहात महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व अंकलखोप विकास सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष जगन्नाथ मिरजकर होते.
श्री. दमामे म्हणाले, “केळीची रोपे फक्त शासन मान्यता प्राप्त लॅब व नर्सरीकडूनच घ्यावीत. लागवडीसाठी योग्य अंतर ठेवावे. सुरुवातीचे तीन महिने रोपांची अधिक काळजी घ्यावी. कोणतीही घाईघाईने खते किंवा अळवणी देऊ नये. रोपे टिकवण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे, अन्यथा उत्पादनात मोठी घट येऊ शकते.”
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “फक्त दुसऱ्याला पाहून शेतीचे निर्णय घेणे धोकादायक ठरू शकते. सध्या बाजारात अनेक औषध आणि खत कंपन्या आहेत, वेगवेगळे लोक सल्ला देतात. त्याला बळी न पडता तज्ज्ञांचा सल्ला घ्या. केळीचे निर्यातक्षम उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करा.”
यावेळी कृषीभूषण रवी पाटील यांनी स्वागत, तर तालुका कृषी अधिकारी अरविंद यमगर यांनी प्रास्ताविक केले. मंडल कृषी अधिकारी संजय खारगे यांनी शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांची सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाला सोपान कुराडे, विशाल सूर्यवंशी, विजय चौगुले, विजय पाटील, अनिल विभुते, उदय पाटील, बाळासाहेब मगदूम, तात्यासाहेब नागवे, पतंगराव पाटील यांच्यासह बुर्ली, संतगाव, खटाव, वसगडे, भिलवडी, ब्रम्हनाळ येथून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार कृषीभूषण प्रशांत पाटील (संतगाव) यांनी मानले.उपकृषी अधिकारी श्री. दौड, श्रीमती रकटे, सहाय्यक कृषी अधिकारी संतोष चव्हाण, आत्मा प्रतिनिधी संजय पार्टे, धनश्री काटकर, कृषी सखी अश्विनी नवले यांनी संयोजन केले. सूत्रसंचालन संजय पार्टे यांनी केले.

Post a Comment

0 Comments